Girish Mahajan Pudhari
जळगाव

Girish Mahajan | शेतकऱ्यांना लवकरच वाढीव मदत; ५ हजार केवळ प्राथमिक अनुदान : गिरीश महाजन

एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदतीची ग्वाही; विरोधकांना ‘मीडिया फोबिया’ झाल्याची टीका

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Farmer Relief

जळगाव : शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले पाच हजार रुपयांचे अनुदान ही केवळ प्राथमिक मदत असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) निकषांपेक्षा अधिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पहूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक आणि राजकीय सेवेतील २५ वर्षांच्या प्रवासानिमित्त जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आदिवासी बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पंचनामे पूर्ण होताच वाढीव मदत

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत असून, पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मदतीची अंतिम रक्कम निश्चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले. कर्जमाफी, वीजबिल माफी आणि सौर कृषी पंपांसारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट केली.

विरोधकांवर महाजनांचा निशाणा

विरोधकांच्या आंदोलनांवर टीका करताना महाजन म्हणाले की, काही नेत्यांना सतत प्रसिद्धीत राहण्याची सवय असून त्यांना ‘मीडिया फोबिया’ झाला आहे. सत्ता असताना शेतकऱ्यांसाठी काय केले, याचा हिशोब विरोधकांनी द्यावा. केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलने आणि उपोषणे केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महायुतीत मतभेद नसल्याचा दावा

महायुतीतील अंतर्गत मतभेदांच्या चर्चाही महाजन यांनी फेटाळल्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेण्यास सक्षम असून मध्यस्थीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पुणे, मराठवाड्यासह राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांत महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून रेशन कार्ड, निवारा, मानधन आणि शेतीविषयक योजनांचे लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT