जळगाव : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर जामनेर पोलिसांनी बोगस आणि प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांच्या साठ्यावर धाडसी कारवाई करत तब्बल ९ लाख १५ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह चार जणांविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, बोगस बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना जामनेर शहरातील साईनाथ नगर परिसरात राहणारा दीपक राजमल चौधरी हा आपल्या घरात प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांचा साठा करून त्यांची बेकायदेशीर विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार गुरुवारी (४ जून) रात्री सुमारे ११.४५ वाजता जामनेर शहरातील वाकी रोडवरील चौधरी यांच्या घरगुती गोदामावर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. झडतीदरम्यान एका खोलीत ४० गोण्यांमध्ये लपवून ठेवलेली प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांची १,०१६ पाकिटे आढळून आली. यामध्ये ‘Diya-59’ आणि ‘Krish-45’ या वाणांचा समावेश असून, जप्त मुद्देमालाची किंमत ९ लाखांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक तपासात या बियाण्यांचे गुजरातशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. अहमदाबाद येथील ‘गोल्ड किंग बायो जीन्स प्रा. लि.’ हे उत्पादक तर ‘हायलंड हायब्रीड सीड्स’ हे विक्रेते असल्याचे समोर आले आहे. मात्र, आरोपींकडे या बियाण्यांच्या खरेदी-विक्रीसाठी कोणताही वैध परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे आढळून आली नाहीत.
चौकशीत दीपक चौधरी याने इतर साथीदारांच्या मदतीने ही बियाणे धरणगाव तालुक्यातील पिंपरी परिसरातील शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे.
बियाणे निरीक्षक राजू बळीराम ढेपले यांच्या फिर्यादीवरून दीपक राजमल चौधरी (रा. साईनाथ नगर, जामनेर), गुलाब आधार पाटील, भूषण पाटील (दोघे रा. वर्डी, ता. चोपडा) आणि तुकाराम कोळी (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, बीज अधिनियम १९६६, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत कडक कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करीत आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, प्रतिबंधित आणि बेकायदेशीर बियाण्यांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ अधिकृत व प्रमाणित विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हेमंत पाटील, ईश्वर पाटील आणि राहुल महाजन यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.