Crime News  Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | वडिलांना माशांचे जेवण न दिल्याने मित्राचा दगडाने ठेचून खून

भालोद शिवारातील धक्कादायक घटना; फैजपूर पोलिसांची तत्पर कारवाई, दोन्ही संशयित काही तासांत ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Two Suspects Detained

जळगाव : वडिलांना माशांचे जेवण का दिले नाही, या कारणावरून झालेल्या वादातून दोन मित्रांनी साथीदाराच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना भालोद शिवारात घडली. रमेश ईश्वरसिंग भावर (वय ३५, रा. खंडवा, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी तत्पर तपास करीत दोन्ही संशयित आरोपींना काही तासांत ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश भावर, सूरज कोळी आणि सूरज ऊर्फ गोलू नेमाडे हे तिघेही मजुरीचे काम करीत होते. मैत्री असल्याने ते एकत्र दारू पिण्यासाठी जमले होते. रविवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास भालोद येथे तिघे मद्यपान करीत होते. यावेळी रमेश याने स्वतःच्या पैशाने मासे विकत आणले होते. हे मासे त्याने मुकेश नावाच्या मित्राकडे स्वयंपाकासाठी दिले होते.

दरम्यान, सूरज कोळी याने रमेशकडे आपल्या वडिलांनाही माशांचे जेवण देण्याची मागणी केली. यावरून दोघांमध्ये दारूच्या नशेत शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जाऊन हाणामारीपर्यंत पोहोचला. त्यानंतर सूरज कोळी आणि सूरज ऊर्फ गोलू नेमाडे यांनी रमेशच्या डोक्यात दगड घातल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात रमेशचा मृत्यू झाला.

मृतदेह खड्ड्यात फेकून आरोपी पसार

घटनेनंतर आरोपींनी रमेशचा मृतदेह एमएसईबी कार्यालयापासून सुमारे १०० मीटर अंतरावरील एका खड्ड्यात फेकून दिला आणि तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर दोन्ही संशयित आरोपींना काही तासांत ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास फैजपूर पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT