Gas Cylinder Robbery Faizpur Pudhari
जळगाव

Jalgaon Robbery| फैजपूरमध्ये गॅस गोदामावर चोरट्यांचा डल्ला; १०० भरलेले सिलिंडर लंपास

पिंपरुड शिवारातील श्रीधर गॅस एजन्सी लक्ष्य; साडेतीन लाखांचा मुद्देमाल गायब

पुढारी वृत्तसेवा

Gas Cylinder Robbery Faizpur

जळगाव : फैजपूर शहराजवळील पिंपरुड रोड परिसरात असलेल्या ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकत तब्बल १०० भरलेले गॅस सिलिंडर चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एजन्सीचे संचालक ललित रघुनाथ राणे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेचा तपशील

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरुड शिवारात ललित राणे यांचे भारत गॅसचे अधिकृत गोदाम असून त्याची साठवण क्षमता सुमारे १२,००० किलो आहे. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राणे यांची पत्नी मृणाल तसेच कर्मचारी दामोदर असटकर यांनी गोदाम व्यवस्थित बंद केले होते. त्या वेळी गोदामात १४.२ किलो वजनाचे एकूण २०९ भरलेले सिलिंडर साठवलेले होते.

शनिवारी (दि. २५) सकाळी साडेआठ वाजता कर्मचारी विशाल कोचुरे गोदाम उघडण्यासाठी आला असता, मुख्य गेटचे कुलूप तुटलेले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने तात्काळ मालकांना माहिती दिल्यानंतर राणे घटनास्थळी पोहोचले. तपासणीदरम्यान गोदामातील १०० सिलिंडर चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केली असल्याचे दिसून येते. एका सिलिंडरची किंमत ३,११८ रुपये असून, एकूण सुमारे ३ लाख ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर नेण्यासाठी मोठ्या वाहनाचा वापर करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

भरवस्तीत व मुख्य रस्त्यालगत असलेल्या गोदामातून इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT