Livestock Farmers Advisory  AI Photo
जळगाव

Jalgaon News | ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनावर भर द्यावा : डॉ. किरण पाटील

संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे आरोग्य आणि दुग्धोत्पादन अबाधित राखण्यासाठी पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची लागवड करणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Livestock Farmers Advisory

जळगाव : जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातील पशुपालकांनी आतापासूनच चारा नियोजनावर विशेष भर द्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे आरोग्य आणि दुग्धोत्पादन अबाधित राखण्यासाठी पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची लागवड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी अशी पिके निवडावीत ज्यातून मुख्य उत्पादनासोबत जनावरांसाठी दर्जेदार चाराही उपलब्ध होईल. त्यामुळे पशुधनाच्या पोषणास मदत होण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्याही लाभ होणार आहे.

शेताच्या बांधावरील अथवा पडीक जमिनीवर उगवणारे नैसर्गिक गवत वाया न घालवता त्याचे योग्य जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दुष्काळ किंवा चारा टंचाईच्या काळात हेच गवत जनावरांसाठी महत्त्वाचा आधार ठरू शकते. तसेच उपलब्ध क्षेत्रात अधिकाधिक चारा उत्पादन करून अतिरिक्त चारा मुरघास (सायलेज) किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पशुसंवर्धन विभागामार्फत ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांना सामोरे जाण्यासाठी पशुपालक व शेतकरी बांधवांना विविध माध्यमांतून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. पशुधन व्यवस्थापन, चारा नियोजन आणि पशुवैद्यकीय सेवांसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

खरीप आणि रब्बी हंगामातील चारा पिकांची साठवणूक करण्यासाठी ‘सायलेज’ तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरून फेब्रुवारी ते जून २०२७ या संभाव्य टंचाईच्या काळात चाऱ्याची उपलब्धता कायम राहील. योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड आणि उपलब्ध चाऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन केल्यास पशुधनाचे पोषण आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित ठेवणे शक्य होईल, असा विश्वास डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT