जळगाव: जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त म्हणून ते आता जबाबदारी स्वीकारणार आहेत. त्यांच्या या निरोपावेळी जळगावच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पालकमंत्री महोदयांनी आपल्या खास शैलीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निरोप देताना, त्यांची काम करण्याची पद्धत, लोकांशी जोडलेली नाळ आणि प्रशासनावरील पकड याबद्दल भरभरून प्रशंसा केली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याबद्दल बोलताना पालकमंत्री म्हणाले, "ते तसे अपक्ष होते, पण आम्हाला वाटायचे ते आमच्याच पक्षाचे आहेत. राजकारणात सगळ्यांना सांभाळावे लागते, मात्र आयुष प्रसाद यांनी महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद अशा तिन्ही स्तरावर समन्वय साधून सर्वांना एकत्र सांभाळले." जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी थेट बोलणे होत नसताना, आयुष प्रसाद यांनी मित्राच्या, भावाच्या नात्याने अडचणी सोडवल्या, याचे भावनिक उदाहरणही पालकमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्री पुढे म्हणाले, "त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील मुख्य सचिव (Chief Secretary) होते, त्यामुळे लाल दिव्याच्या घरातच त्यांचा जन्म झाला. आम्हाला लाल दिव्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण वडाचे झाड कितीही मोठे झाले तरी त्याच्या पारंब्या जमिनीतच असतात, अगदी तसे आयुष प्रसाद हे जमिनीवरील, सामान्य माणसांना समजून घेणारे अधिकारी आहेत."
जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या कामातील समर्पण दर्शवताना पालकमंत्री त्यांना 'भूत' (चांगल्या अर्थाने कामाचे वेड असलेले) असे संबोधले. ते म्हणाले, "कामामध्ये काम करणारा आणि माणसांमध्ये मन जोडलेला माणूस म्हणजे आयुष प्रसाद." विशेषतः जिल्हा नियोजन समिती (DPDC) च्या निधी खर्चाबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्ह्याला मोठा फायदा झाला. "यावर्षी त्यांनी एक रुपयाही शिल्लक ठेवला नाही. गेल्या वेळेस ३१ मार्चपूर्वी तीन रुपये खर्च झाले नव्हते, तेव्हा आयुष प्रसाद निधी खर्च करण्यासाठी अक्षरश: आमच्या मागे लागायचे. त्यांच्या या धडपडीमुळेच दरवर्षी ४०० ते ४५० कोटी रुपयांची असणारी आपली डीपीडीसी आता तब्बल ७७५ कोटी (पावणेआठशे कोटी) रुपयांची झाली आहे."
जळगाव जिल्ह्यातून गेलेले अनेक अधिकारी पुढे मुख्य सचिव झाले आहेत, याचा संदर्भ देत पालकमंत्र्यांनी आयुष प्रसाद यांना थेट भविष्यातील शुभेच्छा दिल्या. "माझे मन १०० टक्के सांगते की, तुम्ही महाराष्ट्राचे भावी मुख्य सचिव व्हाल," असे भाकीत त्यांनी वर्तवले. याचबरोबर, 'नाशिक वाल्यांना काय झाले समजत नाही, आपले लोक घेऊन जात आहेत. माणसे पक्षाची फोडा, पण तुम्ही अधिकारी फोडायला लागले तर...' अशा शब्दांत त्यांनी बदलीवर अप्रत्यक्ष नाराजीही व्यक्त केली.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाशी असलेले संबंध अत्यंत चांगल्या प्रकारे जपले, याचे कौतुक करताना पालकमंत्री म्हणाले, "आम्ही राजकारणी आहोत, आज सत्ताधारी उद्या विरोधी पक्षात राहू, मात्र आपण आजही विरोधी पक्ष जिवंत ठेवला, ही आपली भूमिका राहिली आहे." छोटे-छोटे काम घेऊन येणाऱ्यांनाही त्यांनी कधी निराश केले नाही, ज्यांचे काम करायचे नसायचे, त्यांचाही कार्यक्रम ते बरोबर लावायचे, असे सांगून त्यांच्या प्रशासकीय चातुर्यावर प्रकाश टाकला.
आयुष प्रसाद यांची कारकीर्द जळगावपासून सुरू झाली असून, 'जलनेवाला भी और जलवाला भी', 'सोनेवाला भी और देनेवाला भी' अशा जळगावच्या दोन अर्थांप्रमाणे त्यांची कारकीर्द प्रभावी ठरली.
"तुम्ही जाताय याचे दुःख आहे, पण आनंद आहे की त्या ठिकाणी जगाची लोक (कुंभमेळ्यात) येतील आणि त्यांनाही तिथे यश देवो," अशा शब्दात वणीच्या सप्तशृंगी आईला साखऱ घालून पालकमंत्र्यांनी अत्यंत भावनिक वातावरणात, जळगावच्या कार्यक्षम जिल्हाधिकाऱ्याला निरोप दिला. त्यांच्या निरोपाने एका कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील आणि दूरदृष्टीच्या अधिकाऱ्याची आठवण जळगावच्या नागरिकांच्या मनात कायम राहील.