Jalgaon DCC Bank Pudhari
जळगाव

Jalgaon DCC Bank Election | जिल्हा बँकेसाठी महायुतीचा '१०-७-४' फॉर्म्युला निश्चित; रविवारी जळगावात अंतिम बैठक

भाजप १०, शिवसेना ७, राष्ट्रवादीला ४ जागा मिळण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Guardian Minister Gulabrao Patil

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजप १०, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४ असा '१०-७-४' जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. रविवारी (दि.१५) जळगावात होणाऱ्या अंतिम बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलयांनी या फॉर्म्युल्याला दुजोरा दिला. मात्र, एक-दोन जागांमध्ये बदल होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

जळगाव येथे आयोजित पत्रकार संवादात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेतील राजकीय समीकरणे, महायुतीतील स्थानिक मतभेद, केळी उत्पादकांचे प्रश्न आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीबाबत भूमिका मांडली.

युतीतील मतभेद मिटवून निवडणुकीला सामोरे जाणार

महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादांबाबत बोलताना पाटील म्हणाले की, राजकारणात आणि युतीमध्ये छोटे-मोठे मतभेद होत असतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वाद मिटविण्यात आले आहेत. भुसावळमध्ये अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांच्यावर मतदार यादीतील हरकतींवरून केलेल्या आरोपांबाबत आपण स्वतः चौधरी यांच्याशी चर्चा करून त्यांना समज देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार किशोर पाटील, तर मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील मतभेदांवरही चर्चा सुरू आहे. महायुतीतील सर्व घटकांमध्ये समन्वय साधून हे प्रश्न सोडविले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीवर कारवाईचे आदेश

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या एजंटांकडून कर्जवसुलीसाठी नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. सोनकड परिसरात कंपन्यांचे एजंट पहाटे सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत नागरिकांच्या घरात ठाण मांडून बसतात. एका शेतमजुराला तर 'किडनी विका, पण आमचे पैसे भरा' अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

सक्तीची वसुली करू नये, असे निर्देश असतानाही कंपन्यांचे एजंट दादागिरी करीत असल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित पोलीस निरीक्षकांना दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.

केळी उत्पादकांच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

जळगाव आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील केळी बाजारभावातील तफावतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. व्यापारी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या केळीच्या गाड्या पुढे जाऊ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. जळगावचा बाजारभाव आणि बऱ्हाणपूरमधील दरांमधील फरकाचा फटका रावेर-यावल परिसरातील केळी उत्पादकांना बसत आहे.

हा प्रश्न सोडविण्यासाठी जळगाव आणि बऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून चर्चा केली जाईल. त्यानंतर आवश्यक आदेश काढण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य टाळले

शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी हा संबंधित पक्षांचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी एकत्र यावे किंवा स्वतंत्र तिसरा पक्ष स्थापन करावा, याच्याशी आमचा संबंध नसल्याचे ते म्हणाले.

राज्यभर चर्चेत असलेल्या 'मफलरवाला कोण?' या बॅनरबाजीबाबत आणि अजित पवार यांच्या कथित घातपाताच्या चर्चांबाबतही त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी दिल्लीपर्यंत पोहोचली असून, चौकशीचा अहवाल आल्यानंतरच यावर भाष्य करणे योग्य ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT