Sumit Patil Nomination Form Valid
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाचोरा तालुका मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले उमेदवार सुमित किशोर पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे नामनिर्देशन अर्ज नामंजूर करण्याचा घेतलेला निर्णय नाशिक येथील विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी रद्द केला आहे. त्यामुळे पाटील यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, त्यांच्या निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सुमित किशोर पाटील यांनी 'प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था व संयुक्त शेती संस्था यांचे प्रतिनिधी मतदारसंघ (तालुका पाचोरा)' या गटातून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यांनी अर्ज क्रमांक ३३१, ३३२, ३३३ आणि ३३४ असे चार अर्ज सादर केले होते.
मात्र, २ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे चारही नामनिर्देशन अर्ज नामंजूर केले होते. या निर्णयाविरोधात सुमित पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे अपील दाखल करून दाद मागितली होती. अपील अर्ज क्रमांक ०८, ०९, १० व ११/२०२६ अन्वये या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली.
विभागीय सहनिबंधकांचा पाटील यांच्या बाजूने निर्णय
या अपिलांवर सुनावणी घेतल्यानंतर विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी सुमित किशोर पाटील यांचे नामनिर्देशन अर्ज कायदेशीरदृष्ट्या वैध असल्याचा निष्कर्ष नोंदविला. त्यानुसार १२ नोव्हेंबर २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आदेश पारित करण्यात आले.
या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी नामनिर्देशन अर्ज नामंजूर करण्यासाठी दिलेला निर्णय रद्द करण्यात आला असून, सुमित पाटील यांचे चारही अपील अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तसेच पाचोरा तालुका सोसायटी मतदारसंघाच्या वैध नामनिर्देशनपत्रांच्या यादीत सुमित किशोर पाटील यांचे नाव समाविष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पाचोरा तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण
विभागीय सहनिबंधकांच्या या निर्णयामुळे सुमित किशोर पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून, पाचोरा तालुक्यासह जिल्हा बँकेच्या निवडणूक वर्तुळात या निकालाची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने पाटील यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.