Dharangaon Paldhi Bypass Container Overturns
जळगाव : धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासवरील टाहाकळी फाट्याजवळ बुधवारी (दि.९) भीषण अपघात झाला. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक कंटेनर पलटी होऊन त्याखाली दुचाकीसह उभा असलेला करण जनार्धन सोनवणे (वय २२) हा तरुण दबला गेला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, करण सोनवणे हा दुचाकीवरून टाहाकळी फाट्याजवळ आला होता. त्याने मोटारसायकल रस्त्याच्या एका बाजूला उभी केली आणि मोबाईलवर बोलत असताना काही वेळ थांबला. त्याचवेळी बायपासवरून येणारा कंटेनर अचानक अनियंत्रित होऊन पलटी झाला. पलटी झालेला कंटेनर थेट करणच्या अंगावर कोसळल्याने तो त्याखाली दबला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी करणला बाहेर काढून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. करणच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी बायपासच्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, काम सुरू असल्याची पूर्वसूचना देणारे आवश्यक फलक आणि दिशादर्शक चिन्हे लावण्यात आली नव्हती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील कामाची माहिती उशिरा मिळून कंटेनर अनियंत्रित झाला असावा, असा दावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
अपघातानंतर बायपासवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली. अवघ्या २२ वर्षीय तरुणाचा झालेला दुर्दैवी मृत्यू परिसरातील नागरिकांसाठी चटका लावणारा ठरला.