Dharangaon laborer murder case  Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | मोबाईल अन् पैशांसाठी रक्ताचा सडा! धरणगावात मजुराचा निर्घृण खून; पत्नीलाही बेदम मारहाण

बांभोरी शिवारातील रेल्वे लाईन जवळील थरार; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Dharangaon laborer murder case

जळगाव : पैसे आणि मोबाईल घेतल्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान एका मजुराच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात घडली आहे. पिंटू अमाशा बारेला (वय ३२) या तरुणाचा चाकू, काठी आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी सुनील सीताराम बारेला याला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पिंटू बारेला हा मूळचा मध्य प्रदेशातील बडवणी जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या बांभोरी शिवारात रेल्वे लाईनजवळ कुटुंबासह मजुरीसाठी वास्तव्यास होता. आरोपी सुनील बारेला याला संशय होता की, पिंटूने त्याचे पैसे आणि मोबाईल घेतले आहेत. याच कारणावरून २२ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या सुनीलने पिंटूवर चाकू, काठी आणि दगडाने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात पिंटूचा जागीच मृत्यू झाला.

पतीला वाचवण्यासाठी पिंटूची पत्नी सखुबाई बारेला आणि साक्षीदार कैलास बारेला हे दोघे धावून गेले असता, नराधम सुनीलने त्यांनाही सोडले नाही. त्याने सखुबाईंचा उजवा हात पिरघळून त्यांना बेदम मारहाण केली. डोळ्यादेखत पतीचा जीव जात असताना पत्नी हतबल झाली होती.

घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सखुबाई बारेला यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी सपोनि प्रशांत खंडारे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि २३ मार्चच्या रात्री आरोपी सुनील बारेला याला बेड्या ठोकल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT