जळगाव

River Cable Theft Jalgaon: वाघूर नदीपात्रात केबल चोरांना ग्रामस्थांनी घेरले; ८ जणांची टोळी जेरबंद

सुनसगावात ग्रामस्थांची धडक कारवाई: ४ दुचाकींसह ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : शेतकऱ्यांच्या शेतातील आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरींवरील इलेक्ट्रिक केबल वायर चोरणाऱ्या टोळीचा सुनसगावच्या सतर्क ग्रामस्थांनी पर्दाफाश केला आहे. वाघूर नदीपात्रात चोरी करताना तब्बल ८ जणांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. संशयितांच्या ताब्यातून १० किलो तांब्याची तार आणि गुन्ह्यात वापरलेल्या ४ दुचाकी असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी पंकज नथ्थू पाटील हे २९ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास वाघूर नदीपात्रातील विहिरीवर पाणीपुरवठ्याची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही इसम मोटारीची केबल वायर तोडून चोरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाटील यांनी तात्काळ गावातील नागरिकांना मदतीसाठी पाचारण केले. यावेळी गावातील शेतकरी ईश्वर अंकुश पाटील आणि मनोज कुंभार यांच्याही शेतातील विहिरींच्या केबल चोरीला गेल्याचे समोर आले. संतप्त ग्रामस्थांनी तत्परता दाखवत नदीपात्रात घेराव घालून आठही चोरांना जागीच पकडून ठेवले.

रोहित संजय बोदडे (रा. सुनसगाव), आकाश एकनाथ सोनवणे (रा. सुनसगाव), अजय विश्वास खरोटे (रा. सुनसगाव), रोशन रमेश सपकाळे (रा. सुनसगाव), मनोज धर्मराज पवार (रा. सुनसगाव), प्रेम गणेश सोनवणे (रा. सुनसगाव), अजीज आझाद खाटीक (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), हर्षल शरीफ खाटीक (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) पकडण्यात आलेल्या आरोपींची अशी नावे आहेत.

ग्रामस्थांनी पकडलेल्या या आरोपींकडून १० हजार रुपये किमतीची १० किलो तांब्याची तार आणि ८० हजार रुपये किमतीच्या ४ मोटारसायकली असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी शेतकरी ईश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आठही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर (परिविक्षाधीन उपअधीक्षक), संजय कंखरे, संजय तायडे, धीरज मंडलिक, उदय नखोले, सचिन पारधी, मनोज पाटील, सुभाष सोनवणे आणि चालक इश्तेहाक सैय्यद यांच्या पथकाने केली. पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT