Jalgaon crime news 
जळगाव

Gold Theft Jalgaon : विश्वकर्मा नगरात धाडसी घरफोडी: महाकाल दर्शनाला गेलेल्या भाविकाचे ४६ तोळे सोने अन् दीड लाख लुटले

सीसीटीव्हीत चोरटा कैद; 'खाकी'च्या गस्तीवर प्रश्नचिन्ह, ठसे तज्ज्ञांसह श्वानपथक घटनास्थळी दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहर पोलिसांच्या गस्तीचा बोजवारा उडाला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मा नगरात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ४५ ते ४६ तोळे सोने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घरमालक उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी गेले असताना मध्यरात्री १:३० ते २ वाजेच्या सुमारास हा धाडसी दरोडा टाकण्यात आला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरमालक घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी साधत भामट्याने बंद घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्याने मुद्देमालावर डल्ला मारला आणि पसार झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून भरवस्तीतील या चोरीमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर स्थानिक नागरिकांनी संतप्त सवाल उपस्थित केले आहेत.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळले असता एक संशयित चोरटा कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तात्काळ ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केले; मात्र श्वान घराच्या आसपासच घुटमळल्याने चोरट्याचा पुढील सुगावा लागू शकला नाही. सध्या पोलीस तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा माग काढत आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, नेमका किती ऐवज चोरीला गेला याचा अधिकृत आकडा एफआयआरनंतर स्पष्ट होईल. मात्र, या मोठ्या घरफोडीमुळे जळगाव शहरातील सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT