घरफोडी प्रकरण Pudhari Photo
जळगाव

Jalgaon Burglary | जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा 'सुळसुळाट': एकाच दिवसात ३ घरफोड्या; पोलिसांचा 'कागदी' पहारा!

जळगाव, कासोदा अन् चोपड्यात साडेतीन लाखांवर डल्ला; BSF जवानाचे घरही फोडले

पुढारी वृत्तसेवा

Three Burglaries Jalgaon

जळगाव : जिल्ह्यात पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपुष्टात आला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, एकाच दिवसात जळगाव शहर, कासोदा आणि चोपडा अशा तीन ठिकाणी घरफोड्यांचे सत्र उघडकीस आले आहे. यात चोरट्यांनी चक्क BSF जवानाचे घर आणि पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी बाहेरगावी गेलेल्या वृद्धाचे घर फोडून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. एकूण ३ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पत्नीच्या उपचारासाठी गेले अन् घर साफ झाले (कासोदा)

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रामनगर भागात राहणारे निवृत्त कर्मचारी रमणलाल नथ्थु सोनार (वय ६९) हे आपल्या पत्नीच्या गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी मुलाकडे नवसारी (गुजरात) येथे गेले होते. १५ ते २१ जानेवारी दरम्यान बंद घराची संधी साधत चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकर फोडून चोरट्यांनी ७० हजारांची रोकड, ७० हजारांचे १० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र आणि २५ हजारांचे चांदीचे देव असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घरी परतल्यावर सोनार यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून हवालदार राकेश खोडे तपास करत आहेत.

फौजीच्या घरी धाडसी चोरी (चोपडा)

देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाचे घरही आता सुरक्षित राहिले नसल्याचे चोपड्यातील घटनेने सिद्ध झाले. ओमनगर, चोपडा येथे राहणारे BSF जवान देविदास बारीकराव पाटील (वय ४४) यांच्यासह त्यांच्या साक्षीदारांच्या घरांचे कुलूप २१ जानेवारीच्या पहाटे तोडण्यात आले. चोरट्यांनी सोन्याची पोत, अंगठ्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या धाडसी चोरीमुळे चोपडा शहरात खळबळ उडाली असून मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील करत आहेत.

विद्यार्थ्याच्या घरी डल्ला (जळगाव)

जळगाव शहरातील विठ्ठलवाडी, गट नं. ९८ येथील धवल सुभाष पवार (वय २१) या विद्यार्थ्याच्या घरीही चोरट्यांनी हातसफाई केली. मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील २५ हजारांची रोकड, चांदीचे ग्लास, वाटी, चमचा असा एकूण ३९ हजार २८१ रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोहेकॉ रामकृष्ण इंगळे तपास करत आहेत.

जिल्ह्याच्या तीन वेगवेगळ्या भागात घरफोड्या झाल्याने रात्रीची गस्त नक्की होते कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. सामान्य नागरिक, निवृत्त कर्मचारी आणि जवानही सुरक्षित नसतील, तर पोलिसांनी केवळ 'तपास सुरू आहे' असे न सांगता चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी संतप्त मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT