जळगाव

Jalgaon Crime News | फिर्यादीनेच आरोपीला केले पोलिसांच्या हवाली

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : बोदवड जवळील उजनी रस्त्यावर शेतात पीक पाहणी करण्यासाठी गेलेले बोदवडचे तालुका कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी (वय ५७) यांचे सोमवारी (दि.८) रोजी अपहरण झाल्याचे पोलीसात नोंद करण्यात आली होती. मात्र, सिनेस्टाईलने करण्यात आलेल्या या अपहरणाला वेगळे वळण प्राप्त झाले असून फिर्यादीनेच आरोपी छगन पाडवी याला नंदुरबार पोलिसांच्या हवाली केल्याचे समोर आले आहे.

छगन पाडवी यांच्यावर आर्थिक गुन्हे दाखल

कुर्ला पोलिस ठाण्याचे कर्मचारी नारसिंग पाडवी हे कृषी अधिकारी छगन पाडवी यांना ताब्यात घेण्यासाठी बोदवड पोलिस ठाण्यात आले होते. छगन पाडवी हे कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी असून त्यांच्यावर मुंबई, नवी मुंबई, पुणे, नंदुरबार, बोदवड आणि इडी (प्रवर्तन निदेशालय) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने २५ मे रोजी फेटाळला होता अशी माहिती बोदवडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना दिली. याबाबत छगन पाडवी यांचा फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सोमवारी (दि.८) रोजी रात्री नऊ वाजता उशिरापर्यंत सुरू होते. तर मंगळवारी (दि.८) रोजी पर्यंत नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखा बोदवड पोलीस ठाण्यात छगन पाडवी यांची चौकशी सुरू होती.

काय घडले होते?

नंदुरबार येथे आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात बोदवड तालुका कृषी अधिकारी छगन पाडवी यांचा अटकपूर्व जामीन नाममंजूर झालेला असतानाही ते नंदूरबार न्यायालयात हजर होत नव्हते. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्याचे कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी (वय ५७) उजनी रस्त्यावर एका शेतात पीक पाहण्यासाठी जात होते. दोन किलोमीटर अंतर असताना त्यांच्या चारचाकी वाहनाला दुसऱ्या एका वाहनाने अडवून काहीं जणांनी तालुका कृषी अधिकारी छगन पाडवी यांना त्यांच्या वाहनात जबरदस्तीने बसवून घेऊन गेले. तर छगन पाडवी यांच्या वाहन चालकाला तेथेच सोडून दिले. त्यानंतर वाहन चालक याने थेट कृषी कार्यालय गाठत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना झालेला प्रकार सांगितला.

छगन पाडवी यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल

छगन पाडवी यांनी पुणे व मुंबई येथील काही जणांसोबत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. यामध्ये एस. पी. व्ही. एस. ग्रुप कंपनी, मुंबई येथे तर पुणे येथे ग्लोबल ॲफीलिएट बिजनेस या नावाने कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर नफ्याचे आमिष दाखवत छगन पाडवी यांनी दोन जणांची आर्थिक फसवणूक केली होती. याबाबत बोदवड पोलीस जामनेर या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे ईडीनेही छगन पाडवी यांच्यावर १०० कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे.

पाडवी यांच्यासह नऊ जणांनी नंदुरबार जिल्ह्यात पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष देत अनेकांची फसवणुक केलेली आहे. तर अक्कलकुवा तालुक्यातील जामनेर, धडगाव आणि नंदुरबार शहरातील एकूण २० जणांनी मिळून सुमारे पावणेचार कोटी रुपयांची फसवणुक केली आहे. तर याप्रकरणी दि. १५ एप्रिल २०२४ रोजी छगन पाडवी यांच्यासह बारामती, जालना, नांदेड, फलटण व मुंबई येथे नऊ जणांविरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

एस पी व्ही एस ग्रुप ऑफ कंपनीने बारामती येथे नोव्हेंबर २००० ते सप्टेंबर २०२१ या काळात गुंतवणूकदार व इतरही काही जणांच्या नावे परस्पर कर्ज काढून फसवणूक केल्याची नोंद आहे. त्यानंतर सदर कंपनीने गाशा गुंडाळला होता.

असे झाले अपहरण

ईडीच्या रडारवर असलेले बोदवड तालुक्याचे कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी यांना ताब्यात घेण्यासाठी कुर्ला पोलिस ठाण्याचे कर्मचारी नारसिंग पाडवी हे बोदवड येथे आले असता त्यापूर्वीच छगन पाडवी यांचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली होती. मात्र छगन पाडवी यांच्याकडून फसवणुक झाल्याने त्यांना पकडण्यासाठी दोघांनी छगन पाडवी यांना बोदवड येथून चारचाकीतून अपहरण करत स्वत:च फिर्यादी बनून नंदुरबार पोलीस ठाण्यात आणल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (दि.८) रोजी सायंकाळी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी नंदुरबार पोलीस पुढील तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT