जळगाव : मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या रोडवरील टोल नाका जवळील साईराज ढाब्याच्या पाठीमागे एका हॉल मध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळत असताना मुक्ताईनगर डी वाय एस पी च्या पथकाने छापा टाकला. यामध्ये 1 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर जमीन मालक व इतर व्यक्तींचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की, मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर जाणाऱ्या रोडवरील टोल नाका जवळील साईराज ढाब्याच्या पाठीमागे एका हॉल मध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मंगळवार (दि.6) रोजी 2 वाजेचे सुमारास पोलीसांचे पथक सागर सावे, राजेश महाजन, विशाल पवार, सतिषकुमार भारुडे, राजेंद्र खनके, छोटू वैद्य, पोना देवसिंग तायडे, विजय कचरे, चेतन गवते, विशाल सपकाळे यांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या रोडवरील टोल नाक्या जवळील साईराज ढाब्याच्या पाठिमागे असलेल्या हॉलमध्ये काही इसम हे टेबलवर व काही इसम हे खाली फरशीवर झन्ना मन्ना नावाचा जुगार पैसे लावून खेळतांना मिळून आले. त्यापैकी सहा जण फरार झाले. तर जुगार खेळताना शांताराम जिवराम मंगळकर (वय-50 रा. लाल रेल्वेस्टेसन जवळ ब-हाणपूर) गणेश वसंत पाटील (वय 44 रा. पुरणाड ता. मुक्ताईनगर), महेंद्र बापूराव नाईक ( वय-35 रा. जुनेगाव मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर), युवराज संतोष महाजन (वय-37 रा. निंभोरा सिम ता. रावेर), सुनिल किसन बेलदार (वय-33 रा. कुन्हा ता. मुक्ताईनगर), राजेश सिताराम वाकोडे (वय-50, रा. बाबासाहेब आंबेडकर नगर, नांदुरा ता. नांदुरा जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच फॅशन प्रो कंपनी ब्लॅक कलर मोटर सायकल (क्र. एम एच -19- सि एस - 0836) किमतीची रु.55 हजाराची व एक बजाज डिस्कव्हर मोटरसायकल (क्रमांक एम एच-19- बी एफ -5212 55 हजार) किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
21,500 रुपये जुगाराच्या या खेळातील रक्कम जमा करण्यात आली असून भारतीय चलनाच्या 500 रुपयेच्या 43 नोटा, 10,000/-रुपये किंमतीचे जुगार खेळण्यासाठी असलेले 2 लाकडी चेकर टेबल, 6000 रुपये किंमतीच्या 6 फायबरच्या खुर्च्या, 100 रुपये किंमतीच्या दोन पत्यांचा कॅट असा एकुण 1, लाख 47 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जागा मालक व सहा फरार संशयित आरोपींवर पोलीस कर्मचारी राजेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर सदर पत्ता क्लबची जागा ही राजकीय नेत्याच्या जवळील पदाधिकाऱ्याची असल्याचे सांगण्यात येत आहे.