जळगांव : येत्या काळात निवडणूक लागणार असल्याने राजकीय पदाधिकारी व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याचे काम सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे धरणगाव येथे कार्यालयात गेले असता त्याच कार्यालयाच्या खाली सट्टा सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी करून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी याठिकाणी खुलेआम सट्टा व सट्टा पेढी सुरू असल्याचे त्यांना आढळले.
विद्यमान पालकमंत्री व माजी पालकमंत्री यांच्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात सामना रंगणार असल्याचे चिन्हे दिसू लागलेली आहे. माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे येत्या विधानसभेमध्ये उमेदवार असणार असून त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी जळगाव ग्रामीण भागात दौरे सुरू केले आहे. ते आज धरणगाव येथील त्यांच्या कार्यालयात गेले असता त्याच कार्यालयाच्या खाली खुलेआम सट्टा सुरू होता. विद्यमान पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सुरु असलेल्या या प्रकारावर त्यांनी टीका केली.
जिल्ह्यात खुलेआम सट्टा सुरू आहे. मात्र पोलीस यंत्रणेला तो दिसतच नाही असा भाग झालेला आहे. खुल्या रस्त्यावर सट्टा सुरू असताना त्यात पोलीस प्रशासन या पिढ्यांवर कोणतीच कारवाई करताना दिसून येत नाही. जळगाव शहरात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात तीच परिस्थिती आहे.