Law and Order Jalgaon  Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | जळगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! शनिपेठ पोलीस ठाण्यातच माजी नगरसेवकाला चोप; पोलिसांचा 'वचक' संपला का?

गोपाळपुरा, सुभाष चौक, राजकमल टॉकीज परिसर हे गुन्हेगारीचे केंद्र

पुढारी वृत्तसेवा

Law and Order Jalgaon

जळगाव : जिल्ह्यात पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात असला, तरी वास्तवात मात्र 'खाकी'ची प्रतिमा कमालीची मलीन झाली आहे. विशेषतः शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांनी डोके वर काढले असून, चक्क पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या (DB) खोलीतच मारहाणीच्या घटना घडू लागल्याने गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक संपला की काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दुसरीकडे, विमा फसवणुकीत स्वतः पोलीस कर्मचारीच गजाआड गेल्याने जळगाव पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

शनिपेठेत 'सट्ट्या'चे साम्राज्य

जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपाळपुरा, सुभाष चौक, राजकमल टॉकीज परिसर हे गुन्हेगारीचे केंद्र बनले आहेत. या भागात गेल्या सहा महिन्यांपासून अवैध धंद्यांचा समूळ नायनाट होण्याऐवजी त्यांचा विस्तारच झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पेट्रोल पंपाच्या हाकेच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला झोपड्या टाकून सट्ट्याच्या पिढ्या जोरात सुरू आहेत. दररोज गस्त घालणाऱ्या बीट हवालदारांना हे धंदे दिसत नाहीत की ते जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत? अशी शंका आता घेतली जात आहे.

पोलीस ठाण्यातच राडा; वचक कुठे गेला?

शनिवारी भर दुपारी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारात जे घडले, त्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गुन्हे शोध पथकाच्या रूममध्येच एका व्यक्तीने शिरून माजी नगरसेवकाला मारहाण केली. ज्या ठिकाणी गुन्हेगारांच्या मनात धडकी भरायला हवी, तिथेच मारामारी होत असेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहावे? याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असले, तरी पोलिसांच्या हद्दीतच होणारी ही हिंमत गुन्हेगारीच्या वाढलेल्या प्रभावाचे प्रतीक आहे.

'वर्दी'तले गुन्हेगार आणि विमा घोटाळा

जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे रक्षकच भक्षक बनल्याचे चित्र आहे. विमा कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीत पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. मेहुणबारे आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे हे 'कनेक्शन' पाहून सर्वसामान्यांचे धाबे दणाणले आहेत.

'दक्षता'च्या नावाखाली लूट

पोलीस दलाच्या कल्याणकारी उपक्रमाचा भाग असलेल्या 'दक्षता' पेट्रोल पंपावरही भ्रष्टाचार पोहचला आहे. येथील व्यवस्थापकाने आपल्या मुलाच्या मदतीने १ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा अपहार केला आहे. याप्रकरणी अटकेची कारवाई झाली असली, तरी पोलीस खात्याच्या अंतर्गत असलेल्या संस्थेत इतका मोठा फ्रॉड होतोच कसा? हा मोठा प्रश्न आहे.

ठराविक 'लॉबी'चे वर्चस्व?

शनिपेठ पोलीस ठाण्यात ठराविक कर्मचारी आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या 'लॉबी'चे वर्चस्व असल्याची चर्चा पोलीस दलातच दबक्या आवाजात सुरू आहे. रेती तस्कर, सट्टा चालक, मटका आणि अवैध दारू विक्रेत्यांना जणू काही पोलिसांची 'मूक संमती'च मिळाली आहे. कारवाईच्या नावाखाली फक्त रेकॉर्डवर नोंद करण्यापुरती हालचाल होते, पण अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याबाबत अनास्था दिसून येत आहे.

आता जिल्हा पोलीस अधीक्षक या परिस्थितीवर काय ठोस कारवाई करतात, की हे अवैध धंदे असेच फोफावत राहतात, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT