major cattle smuggling foiled by jamner police in jalgaon
जळगाव : बकरी ईदच्या तोंडावर जामनेर शहरात गोवंशाची अवैध कत्तल आणि तस्करी करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कायदेशीर बडगा उगारला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कडक निर्देशानंतर जामनेर पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने संयुक्त 'सर्जिकल स्ट्राईक' करत तब्बल ६० ते ६५ जनावरांची क्रूरतेच्या विळख्यातून सुटका केली. ईद अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना झालेल्या या धडक कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील अवैध पशुतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
गुप्त माहितीवरून 'हायव्होल्टेज' कारवाई
जामनेर शहरातील घोडे पीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर आणि इस्लामपूर भागात मोठ्या प्रमाणावर गोवंश डांबून ठेवल्याची पक्की माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, मुख्याधिकारी नितीन बागुल आणि पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (२६ मे) संशयास्पद ठिकाणांवर अचानक छापे टाकले.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यावेळी कत्तल आणि अवैध वाहतुकीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयपणे बांधून ठेवलेली ६५ पेक्षा जास्त जनावरे पोलिसांना आढळून आली. कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व जनावरांची सुटका करून त्यांना तातडीने जळगाव येथील सुरक्षित गोशाळेत रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
"अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलबाजी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. या कारवाईत जप्त केलेली जनावरे सुरक्षित ठिकाणी पाठवली असून, या रॅकेटमध्ये सामील असलेल्या सर्व दोषींवर कठोर गुन्हे दाखल केले जात आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही."— मुरलीधर कासार, पोलीस निरीक्षक जामनेर