Jalgaon crime Pudhari
जळगाव

Jalgaon crime: अडावद परिसर खुनाने हादरला; क्रूर पित्याकडून १३ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या, ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी पहाटे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका पित्याने गाढ झोपेत असलेल्या आपल्या दोन मुलांवर कुऱ्हाडीने सपासप वार करत १३ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केली, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे वडतीसह संपूर्ण अडावद परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुभाष गोकुळ भिलाळ (वय ५५) याने रविवारी पहाटे आपल्या घरात झोपलेल्या मुलांवर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मीरा सुभाष भिलाळ (वय १३) हिचा जागीच मृत्यू झाला, तर रामू सुभाष भिलाळ (वय ११) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेनंतर आरोपी जंगलाच्या दिशेने फरार झाला. माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत कंडारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून जंगल परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा सर्व बाजूंनी अडावद पोलीस तपास करीत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीला तीन मुलगे व तीन मुली असून त्यापैकी दोन मुलगे आणि दोन मुलींचे विवाह झाले आहेत. आरोपीची पत्नी सध्या जळगाव परिसरात राहत असल्याची माहिती आहे. घराची साफसफाई व दुरुस्ती करण्यासाठी आरोपी गेल्या दोन-तीन दिवसांपासून वडती येथे आपल्या दोन लहान मुलांसह राहत होता.

स्थानिकांकडून आरोपी दारूच्या व्यसनाधीन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे हल्ल्याचे खरे कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT