Crime News Pudahri
जळगाव

Jalgaon crime news | भुसावळात गावठी पिस्तुलासह दोन जण' गजाआड

बाजारपेठ पोलिसांची मध्यरात्री धाडसी कारवाई; मध्यप्रदेशच्या कनेक्शनसह स्थानिक साथीदार जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : भुसावळ शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या परिसरात मध्यरात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

१४ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून 'टिप' मिळाली. शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत काही इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांनी तातडीने पथक तैनात केले.

पोलिसांनी या परिसराला वेढा घालून छापा टाकला असता, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले आरोपी असद अली शेख खालीद अली (वय १९ वर्षे, रा. आझाद नगर, बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील असद अली हा मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरचा रहिवासी असल्याने यामागे आंतरराज्यीय शस्त्र तस्करीचे रॅकेट तर नाही ना? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

पोलिसांनी घेतलेल्या झडतीत आरोपींच्या कब्जातून गावठी पिस्तूल एक लोखंडी बनावटीचे मॅगझिनसह पिस्तूल काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप असलेले किंमत ४०,०००/- रुपये. व जिवंत काडतूस एक राऊंड त्याची किंमत १,०००/- रुपये. असे एकूण मुद्देमाल ४१ हजार रुपये जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट ३/२५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT