Cheque Bounce Case Karnataka Businessmen Sentenced
जळगाव : कर्नाटकातील ‘राजेंद्र ट्रेड लिंक’ या भागीदारी संस्थेचे भागीदार मिथुन सुरेश जैन व प्रशांत प्रकाश जैन यांना धनादेश अनादर प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने दोघांना सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड या कंपनीला एकूण १ कोटी ८ लाख २० हजार ५८८ रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. विद्यमान कायद्यानुसार धनादेश अनादर प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून जलद व कठोर कारवाई होत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथील राजेंद्र ट्रेड लिंक या संस्थेने जैन इरिगेशन कंपनीकडून घेतलेल्या मालाच्या देयकापोटी ५४ लाख १० हजार २९४ रुपयांचा धनादेश दिला होता. संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर तो अनादरित झाला. त्यानंतर कंपनीने कायदेशीर नोटीस पाठवूनही आरोपींनी रक्कम अदा केली नाही. त्यामुळे कंपनीने न्यायालयात दावा दाखल केला.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व सादर पुरावे विचारात घेऊन निकाल दिला. त्यानुसार आरोपींना ६ महिन्यांचा साधा कारावास व १ कोटी ८ लाख २० हजार ५८८ रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच कायदेशीर खर्चापोटी अतिरिक्त १५ हजार रुपये देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. कंपनीच्या वतीने ॲड. निशांत सुशील अत्रे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
धनादेश अनादर हा Negotiable Instruments Act, 1881 मधील कलम १३८ नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. या कलमानुसार धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट दंड आणि दोन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. या निकालामुळे व्यावसायिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता व कायदेशीर जबाबदारीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.