Jalgaon Collector Office Tree Pudhari
जळगाव

Jalgaon News | जिल्हाधिकारी कार्यालयातच वृक्षांचा 'गळा आवळला': ३० वर्षांची झाडे धोक्यात; ठेकेदाराची मनमानी अन् अभियंत्यांचा आदेश धाब्यावर?

हेरिटेज इमारतीच्या परिसरात सिमेंटचा विळखा!

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Collector Office Tree Issues

जळगाव: जळगाव जिल्हा प्रशासनाकडून एकीकडे वृक्ष लागवडीचे दावे केले जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच वृक्षांची पद्धतशीरपणे 'नासाडी' करण्याचा घाट घातला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील ऐतिहासिक 'हेरिटेज' इमारतीच्या अवतीभवती असलेल्या ३० ते ४० वर्षे जुन्या वृक्षांच्या मुळांभोवती चक्क सिमेंट काँक्रीटचे थर टाकले जात असून, यामुळे भविष्यात हे वृक्ष मोडून पडून मोठी जीवित वा वित्तहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे.

झाडे जगवण्यासाठी नाही, तर मारण्यासाठीच खटाटोप?

जिल्हाधिकारी कार्यालयातील हेरिटेज इमारतीचे सौंदर्य वाढवणारी ही जुनी झाडे आता प्रशासकीय अनास्थेचे बळी ठरत आहेत. नियमानुसार झाडाच्या बुंध्याभोवती ठराविक जागा मोकळी ठेवणे बंधनकारक असते. मात्र, संबंधित ठेकेदाराने या झाडांच्या मुळांपर्यंत सिमेंट काँक्रीटचे पॅचेस टाकले आहेत. यामुळे पाणी अडले,

श्वास कोंडला: मुळांना पाणी न मिळाल्याने ही झाडे वाळतील.

अपघाताचे निमंत्रण: कमकुवत झालेली ही झाडे इमारतीवर, संरक्षक भिंतीवर किंवा रस्त्यावरील नागरिकांवर कोसळण्याची दाट शक्यता आहे.

शॉर्टकटचा मार्ग: झाडे अधिकृतपणे तोडता येत नाहीत, म्हणून त्यांना वाळवून मारण्याचा हा 'ठेकेदारी' प्रयत्न आहे का? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

साहेबांचा आदेश 'देवरे' यांनी धुडकावला?

या गंभीर प्रकाराबाबत संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सोनवणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. सोनवणे यांनी तातडीने दखल घेत कनिष्ठ अभियंता श्री. देवरे यांना बोलावून झाडांच्या बुंध्याभोवती गोलाकार जागा मोकळी ठेवण्याच्या (Tree Rings) सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात देवरे आणि संबंधित ठेकेदाराने या सूचनांना केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. प्रशासकीय आदेशालाच जुमानले जात नसल्याने येथे नेमके कुणाचे हित जपले जात आहे, असा संशय बळावला आहे.

जळगाव 'भट्टी' होणार; सिमेंट रस्त्यांचा ताप वाढला!

एकीकडे ममुराबाद वेधशाळेने जिल्ह्याचा पारा ३८ अंशांवर पोहोचल्याची नोंद केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जळगावचे ऊन प्रसिद्ध असताना शहरात चहूबाजूंनी सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले जात आहेत. रस्त्या कडेची झाडे आधीच गायब झाली आहेत, त्यात आता सिमेंटच्या रस्त्यांमुळे तीव्र उष्णता उत्सर्जित होऊन जळगावकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्याऐवजी केवळ काँक्रीटीकरणावर भर दिल्याने भविष्यात जळगावचे तापमान सहनशक्तीच्या पलीकडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हेरिटेज इमारतीचे रक्षण करायचे की सिमेंटच्या हव्यासापोटी निसर्गाचा वारसा संपवायचा? जर या परिसरात एखादे झाड पडून दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार असणारे अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हे दाखल होणार का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT