Chopda Pradeep Mahajan Case Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | महाजन खूनप्रकरण: धावत्या रेल्वेतच आरोपी जेरबंद; २४ तासांत छडा

गुन्हा करून मुंबईकडे पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी चकवा देत धावत्या रेल्वेतच पकडले

पुढारी वृत्तसेवा

Chopda Pradeep Mahajan Case

जळगाव : चोपडा शहराला हादरवून सोडणाऱ्या प्रदीप राजेंद्र महाजन खून प्रकरणातील आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक करत मोठे यश मिळवले आहे. गुन्हा करून मुंबईकडे पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी चकवा देत धावत्या रेल्वेतच पकडले.

चोपडा-धरणगाव मार्गावरील पाटचारी परिसरात १९ एप्रिलच्या रात्री प्रदीप महाजन (वय ३३, रा. तारामती नगर) यांची अज्ञात हत्याराने डोके व चेहऱ्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासात हा प्रकार जुना वैरातून घडल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होताच तपासाला वेग देण्यात आला.

गुन्ह्यानंतर आरोपी विजय भास्कर वैदकर आणि निर्मल संजय बडगुजर हे फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आरोपी मुंबईत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथक मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, आरोपी दादरहून जळगावकडे रेल्वेने परतत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी नाशिक ते चाळीसगाव दरम्यान रेल्वेमध्ये सापळा रचला.

धावत्या रेल्वेत तपासणी करत असताना दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या वादातून संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचे मुख्य आरोपी विजय वैदकर याने सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT