Police Case On DJ Owner  AI photo
जळगाव

Noise Pollution Jalgaon | कर्कश डीजेचा दणदणाट भोवला; चोपड्यात ‘मोहिनी डीजे बँड’ मालकाविरोधात गुन्हा

पोलिसांनी दिलेली नोटीस धाब्यावर बसवून मोठ्या आवाजात डीजे वाजवणे चालकाला चांगलेच महागात

पुढारी वृत्तसेवा

Police Case On DJ Owner

चोपडा : सण-उत्सवांच्या मिरवणुकीत कर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जहारवीर गोगाजी महाराज जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तब्बल १२०.९ डेसिबल आवाजात डीजे वाजवणाऱ्या ‘मोहिनी डीजे बँड’च्या मालकाविरोधात चोपडा शहर पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेली नोटीस धाब्यावर बसवून मोठ्या आवाजात डीजे वाजवणे चालकाला चांगलेच महागात पडले.

जिल्ह्यात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, ६ सप्टेंबर रोजी चोपडा शहरात झालेल्या जहारवीर गोगाजी महाराज जन्मोत्सवाच्या मिरवणुकीपूर्वी आयोजक व मंडळांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. मोठ्या क्षमतेच्या डॉल्बी व डीजेचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.

मिरवणूक रूपम ज्वेलर्सजवळ पोहोचली असता ‘मोहिनी डीजे बँड’चे मालक सचिन ऊर्फ पिंटू पंडित शिरसाठ (३७, रा. पंचशील नगर, चोपडा) हे मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आवाज कमी करण्याची सूचना करूनही डीजे सुरूच ठेवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष ‘टेस्टो’ कंपनीच्या ध्वनीमापक यंत्राद्वारे आवाजाची तीव्रता तपासली.

या तपासणीत कमाल आवाज १२०.९ डेसिबल, सरासरी आवाज ११५.६ डेसिबल, तर किमान आवाज ११३ डेसिबल असल्याचे आढळले. निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या प्रमाणात आवाज असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मिरवणूक संपल्यानंतर सचिन शिरसाठ याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, ध्वनीप्रदूषण नियमन तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांच्या पथकाने केली. उत्सवांच्या काळात ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT