Jalgaon news
जळगाव : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडाव शिवारातील वनजमिनीवर बेकायदेशीररीत्या जोपासलेल्या गांजाच्या महाकाय शेतीचा चोपडा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. १० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास केलेल्या या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी तब्बल १ हजार ८७० किलो वजनाचा ओला गांजा जप्त केला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच या ‘नशेच्या शेतीचा’ मुख्य सूत्रधार जुम्मा आरसी पावरा (रा. खाऱ्यापाडाव) हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.
खाऱ्यापाडाव शिवारातील वन कम्पार्टमेंट क्रमांक २४० मधील पडीक जमिनीवर जुम्मा आरसी पावरा याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या शेतात छापा टाकला. यावेळी शेतात ४ ते ६ फूट उंचीची हिरवीगार, ताजी आणि उग्र वासाची गांजाची झाडे बहरलेली आढळून आली. पोलीस कारवाई सुरू असल्याचे पाहताच संशयित आरोपी जुम्मा पावरा याने जंगलाचा आसरा घेत पळ काढला.
पोलिसांनी शेतातील सर्व गांजाची झाडे उपटून ती स्वराज ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत (क्रमांक एम.एच. १९ ई.ए. ३६२५) भरली. या मालाचे अचूक वजन करण्यासाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्याचा वापर करण्यात आला. मालासह ट्रॅक्टरचे वजन ६ हजार २६० किलो, तर रिकाम्या ट्रॅक्टरचे वजन ४ हजार ३९० किलो भरले. त्यानुसार निव्वळ गांजाच्या पिकाचे वजन १ हजार ८७० किलो इतके निष्पन्न झाले. प्रतिकिलो २५ हजार रुपये दराने या मुद्देमालाची एकूण किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी शेतातील तसेच गांजाच्या मुळाला लागलेल्या मातीचे नमुने रासायनिक तपासणीसाठी सीलबंद केले आहेत.
या मोठ्या कारवाईची माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी मंगळवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५:३० वाजेदरम्यान घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल शुभम ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम, १९८५ (एनडीपीएस कायदा) कलम २० (अ), २२, २८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत असून, पसार झालेल्या आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती आढळून आल्याने वनविभाग आणि स्थानिक यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.