जळगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क | इंदोर ते जळगाव या मार्गावरुन येणाऱ्या खाजगी बसचा रविवारी (दि.6) पहाटे जळगावात भीषण अपघाताची घटला घडली. आमोदा मोरनदीच्या पुलावरून बॅरिकेट तोडून एक खाजगी बस थेट नदीत कोसळली. या बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. प्रवासी गाढ झोपलेले असताना बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी जखमी झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशीच रविवारी (दि.6) रोजी फैजपूर ते भुसावळ दरम्यान आमोदाजवळ इंदूरवरुन सकाळी जळगावकडे जात असताना एक खाजगी ट्रॅव्हल्स आमोदा पुलावरून खाली कोसळली. या नदीमध्ये सुदैवाने पाणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. बस नदीत पलटी झाल्याने प्रवासी जखमी झाले आहेत.
इंदूरवरुन भुसावळच्या दिशेने एमपी 09-9009 या क्रमांकाची ही खासगी लक्झरी बस येत होती. रविवारी (दि.6) रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही बस आमोदा गावाजवळील नदीवरील पुलावरुन जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नदीपात्रात कोसळली. या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह ग्रामस्थांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. ग्रामस्थांनी जखमींना रुगणालयात पोहचवण्यासाठी मदत केली. फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू असून अपघातामुळे आमोदा गावाजवळील मोरनदीवरील पूलाच्या भागातील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
फैसपूर ते आमोदा दरम्यानच्या रस्त्यावर अपघाताच्या मालिकाच समोर येत असून आठवड्यात वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात घडत असल्याने नागरिकांचे म्हणणे असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. तर गेल्या एका महिन्यात हा 26 वा अपघात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.