Gold stolen in Jalgaon Pudhari
जळगाव

Jalgaon Robbery | जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरफोड्यांत दीड लाखांहून अधिक ऐवज लंपास

रामानंद नगर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

Two houses Robbed Jalgaon

जळगाव : शहरातील रायसोनी नगर तसेच ग्रामीण भागातील उमाळा शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोंडे तोडून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दीड लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी रामानंद नगर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रायसोनी नगरातील घरफोडीत ५५ हजारांचा ऐवज चोरीला

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायसोनी नगर येथे ही घटना घडली. येथील रहिवासी पंकज सुरेश भावसार (वय ४१) हे कामानिमित्त बाहेर गेले असताना १५ मे रोजी पहाटे ५ ते १८ मे रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील लॉकर फोडून चांदीचे कडे, चांदीचे शिक्के तसेच विविध मूल्यांच्या नोटांमध्ये ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी पंकज भावसार यांच्या फिर्यादीवरून २० मे रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहेत.

उमाळा शिवारात ९५ हजारांची चोरी

दुसरी घटना जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारात घडली. शेतकरी गणेश भगवान खलसे (वय ३०) यांच्या घरात १९ मे रोजी रात्री ८ ते २० मे रोजी पहाटे २.४० वाजेदरम्यान चोरट्यांनी घराच्या पुढील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून प्रवेश केला. घरातील दोन लोखंडी कपाटांचे लॉकर फोडून सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

या घटनेप्रकरणी गणेश खलसे यांच्या फिर्यादीवरून २० मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT