Bodwad Muktainagar Crop Damage Inspection
जळगाव : पावसाने दीर्घ दडी मारल्याने खरीप पिके करपण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यांतील शेतांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांना ‘टेबल रिपोर्ट’ न करता शेताच्या बांधावर जाऊन वस्तुस्थितीच्या आधारे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
मका, कापूस आणि सोयाबीन या खरीप पिकांना पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा मोठा फटका बसला आहे. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, कोरडवाहू शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली.
पाहणीनंतर मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पंचनाम्यांमध्ये कोणत्याही प्रकारची चालढकल अथवा त्रुटी राहू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
“पंचनामे करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची स्थिती पाहा आणि वस्तुस्थिती अहवालात नमूद करा. जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील परिस्थिती नाशिक येथे होणाऱ्या विभागीय बैठकीत कृषिमंत्र्यांसमोर मांडून शेतकऱ्यांसाठी भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,” असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी केली.
पावसाचा खंड कायम राहिल्यास पाणी आणि चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरण, पाणीपुरवठा, कृषी, महसूल आणि पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
गावनिहाय पाण्याचे उपलब्ध स्रोत तपासून नियोजन करावे. जनावरांसाठी चारा उपलब्धतेबाबतही आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच जळालेले डीपी, कृषिपंपांचा वीजपुरवठा आणि विहिरीवरील मोटारी व केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महावितरण आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक नंदराज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, तहसीलदार गिरीश वखारे, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.