Jalgaon Bhusawal theft
जळगाव : भुसावळ शहरात मंगळवारी (दि. २८) रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीकडून तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सत्यसाई नगर परिसरात मोटारसायकलला धक्का देऊन तीन जणांनी ही लाखोंची रोकड असलेली बॅग बळजबरीने हिसकावून नेत पोबारा केला. या घटनेमुळे भुसावळ शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोहम्मद यासीन मोहम्मद ईस्माईल (वय ३९, रा. सत्यसाई नगर, खडका रोड, भुसावळ). मंगळवारी रात्री १०:२० वाजेच्या सुमारास, सत्यसाई नगर येथील एका कॉम्प्लेक्सजवळून मोटारसायकल (एमएच १९ बीसी ५५८६) वरुन घरी जात होते. त्यांनी निळ्या रंगाची चैनची चौकोनी पैशांची थैली मोटारसायकलच्या समोर ठेवली होती. यावेळी पाठीमागून आलेल्या तीन जणांनी त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धक्का दिला.
धक्का लागल्याने मोहम्मद यासीन यांची मोटारसायकल रस्त्यावर पडली आणि त्यांच्या ताब्यातील 25 लाख 42 हजार रुपयाची पैशांनी भरलेली निळ्या रंगाची थैली देखील खाली पडली. याच संधीचा फायदा घेऊन या तिघांनी मोहम्मद यासीन यांच्या ताब्यातून ही पैशांनी भरलेली थैली बळजबरीने हिसकावून चोरून नेली. आरोपींनी एवढी मोठी रोकड भर रस्त्यावर लुटून क्षणार्धात घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर, मोहम्मद यासीन मोहम्मद ईस्माईल यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शहरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांपुढे आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.