Crime Pudhari
जळगाव

Bhusawal Crime | दारूच्या नशेत शिवीगाळ; रुमालाने गळा आवळून मित्राचा खून

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातील घटना; घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर

पुढारी वृत्तसेवा

Bhusawal Railway Station

जळगाव : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ शिवीगाळीचा राग अनावर झाल्याने मित्रानेच मित्राचा रुमालाने गळा आवळून तसेच डोके जमिनीवर आपटून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात घडली. मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या पलीकडील अंधाऱ्या परिसरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर संशयित आरोपी सकाळी स्वतःहून वरणगाव पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

राहुल सदाशिव धांडे (वय ३५, रा. भुसावळ) असे मृताचे नाव आहे. पवन अनिल सोनावणे (वय ३०, रा. आंबेडकरनगर, वरणगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल धांडे हा भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात साफसफाई तसेच अन्य कामे करीत होता. तर पवन सोनावणे हा काही काळापूर्वीपर्यंत रेल्वे गाड्यांमध्ये चणे-फुटाणे विकण्याचे काम करीत होता. दोघांची जुनी मैत्री असल्याने ते नेहमी एकत्र दारू पीत असल्याचे सांगण्यात येते.

गुरुवारी रात्री दोघेही रेल्वे स्थानकाच्या पलीकडील अंधाऱ्या परिसरात दारू पिण्यासाठी बसले होते. दारूच्या नशेत राहुल याने पवनला शिवीगाळ केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान हत्येत झाले. संतापलेल्या पवनने स्वतःकडील रुमालाने राहुलचा गळा आवळला. त्यानंतर त्याचे डोके जमिनीवर जोरात आपटल्याने राहुलचा मृत्यू झाला.

काही महिन्यांपूर्वी पवन हा धावत्या रेल्वेतून खाली पडला होता. या घटनेनंतर त्याच्या वर्तनात बदल झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या बाबतची अधिकृत पुष्टी पोलिस तपासातून होणे बाकी आहे.

या घटनेनंतर पवन घटनास्थळावरून निघून गेला. मात्र, शुक्रवारी सकाळी तो स्वतःहून वरणगाव पोलिस ठाण्यात पोहोचला. “माझ्या हातून मित्राचा खून झाला आहे,” अशी कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे समजते. त्यानंतर वरणगाव पोलिसांनी तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT