Bhusawal Son Kills Mother Friend
जळगाव : आईसोबत असलेल्या कथित मैत्रीपूर्ण संबंधांचा राग मनात धरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने ३६ वर्षीय तरुणाची धारदार चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरातील पाटील मळा परिसरात घडली. तुषार गोविंद सोनवणे (वय ३६, रा. श्रावस्तीनगर, भुसावळ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून, घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अल्पवयीन मुलाच्या आईसोबत तुषार सोनवणे याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. या संबंधांबाबत अल्पवयीन मुलाच्या मनात तुषारविषयी तीव्र राग होता. त्यातूनच त्याने तुषारला संपविण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारी (दि.१०) रात्री अल्पवयीन मुलाने तुषारला फोन केला. 'वडील कामानिमित्त नाशिकला गेले आहेत,' असे सांगून त्याने तुषारला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर स्वतः दुचाकी घेऊन तो तुषारला आणण्यासाठी गेला.
तुषारला दुचाकीवर बसवून आणल्यानंतर संशयिताने त्याला दुचाकी चालविण्यास सांगितले आणि स्वतः मागे बसला. पाटील मळा परिसरात पोहोचल्यानंतर मागे बसलेल्या अल्पवयीन मुलाने जवळ ठेवलेला धारदार चाकू काढला. त्याने तुषारच्या डोक्यावर, कपाळावर आणि पाठीवर चाकूने वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तुषार रस्त्यावर कोसळला. त्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, मध्यरात्री गोविंद सोनवणे यांना त्यांच्या दत्तक मुलाने फोन करून तुषार जखमी अवस्थेत पाटील मळ्यात पडल्याची माहिती दिली. नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तुषारला रुग्णवाहिकेतून भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परतेने १७ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले असून, घटनेमागील नेमके कारण, हत्येचे नियोजन आणि वापरलेल्या हत्याराबाबत पुढील तपास सुरू आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल तायडे तपास करीत आहेत.