Bhusawal Weapon Smuggling
भुसावळ : शहरातील एका वॉटर पार्कच्या मागील परिसरात अवैध शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन गावठी पिस्तुले (कट्टे) आणि एक धारदार गुप्ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १) रात्री सुमारे ८ वाजता पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एका मोकळ्या जागेत संशयास्पद हालचाली करणारा तरुण शस्त्रांसह थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण शांताराम कोळी (वय १९, रा. पाडळसा, ता. यावल) याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले (मॅगझीनसह), १३.५ इंच पाते असलेली गुप्ती आणि एक मोबाईल असा सुमारे ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित शस्त्रे बाळगण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३/२५, ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असून, आरोपीने ही शस्त्रे कुठून आणली आणि त्यांचा वापर कशासाठी होणार होता, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यात चिंता व्यक्त होत आहे.