Robbery Case  AI Photo
जळगाव

Bhusawal Robbery | भुसावळमध्ये थरार; धान्य व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून २ लाखांची रोकड लुटली

अज्ञात दरोडेखोरांच्या हल्ल्यात पुतण्या जखमी, गंभीर जखमी व्यापाऱ्याला जळगावला हलवले

पुढारी वृत्तसेवा

Bhusawal Grain Trader Robbery

जळगाव/भुसावळ : भुसावळ शहरातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, टीव्ही टॉवर परिसरात सोमवारी रात्री धक्कादायक लुटीची घटना घडली. अण्णाभाऊ साठे मार्केटमधील दुकान बंद करून घरी जात असलेल्या ५० वर्षीय धान्य व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून अज्ञात तिघांनी त्यांच्याकडील दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड लुटल्याची माहिती आहे. लाकडी दांड्याने केलेल्या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

दुचाकीवरून पाठलाग करून हल्ला

अजय प्रेमचंद कोटेचा (वय ५०, रा. टीव्ही टॉवर परिसर, भुसावळ) हे सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता त्यांचा १९ वर्षीय पुतण्या मीत कोटेचा याच्यासोबत दुचाकीवरून घरी जात होते. भूमी अभिलेख कार्यालयासमोर रस्त्यावरील बंद पथदिव्यांमुळे निर्माण झालेल्या अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केल्याचे सांगण्यात येत आहे.

अचानक आरोपींनी अजय कोटेचा यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांना थांबवले. त्यानंतर लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यावर जोरदार वार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. त्यानंतर त्यांच्या जवळील दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड असलेली बॅग हिसकावून तिघांनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पलायन केले.

हल्ल्यात अजय कोटेचा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना रात्री साडेअकराच्या सुमारास पुढील उपचारांसाठी जळगाव येथे हलविण्यात आले असून, न्यूरोसर्जनच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या हल्ल्यात त्यांचा पुतण्या मीत यालाही मारहाण झाल्याचे समजते.

अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

टीव्ही टॉवर परिसरातील रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने या घटनेत अंधाराचा फायदा आरोपींना मिळाल्याचे सांगितले जात आहे. शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पोलिसांची गस्त याबाबतही या घटनेमुळे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भुसावळ हे रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर असून, शहरात चोरी, लूटमार आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT