Shooting incident in Bhusawal
जळगाव : भुसावळ येथील जुना सातारा परिसरात असलेल्या पान टपरी चालकावर चौघांनी गोळीबार केल्याची घटना बुधवारी (दि. 17 ) रात्री घडली. यात जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी सट्टा पत्ता सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जुना सातारा परिसरातील खळवाडी कडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या उल्हास गणेश पाटील (वय 39) यांच्या मालकीच्या पानटपरीवर थरार घडला. उल्हास पाटील हे टपरीत बसलेले असताना तोंड झाकून आलेल्या चार जणांनी त्यांच्या पान टपरीतील रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला. टपरी चालकाने याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्या चोरट्यांनी थेट उल्हास गणेश पाटील यांच्यावर गोळीबार केला. यानंतर ते चौघे भामटे मोटारसायकलवरून पळून गेले.
अवघ्या काही क्षणांमध्ये घडलेल्या या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यात उल्हास गणेश पाटील यांच्या छातीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या हल्लेखोरांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या हल्ल्याची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीराने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्या पानं टपरीवर गोळीबार झाला त्या ठिकाणी सट्टा सुरू असल्याची चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे सदर युवक दारूसाठी पैसे मागण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते अशी चर्चा त्या ठिकाणी ऐकू आली मात्र पोलिसांनी याला नकार दिला आहे.