Laxman Patil Jalgaon APMC Chairman
जळगाव : जळगाव शहरांमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव दाखल झाला होता. मात्र, त्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे आज (दि.१८) जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या आल्याने ते अखेर लकी ठरल्याची चर्चा सुरू होती.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महायुतीला निर्णायक बहुमत असले तरी सभापती निवडीत मोठे नाट्य घडले आहे. याआधी शामकांत सोनवणे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणून सुनील महाजन हे बाजार समिती सभापती बनले होते. तर, अवघ्या सहा-सात महिन्यात सुनील महाजन यांच्या विरोधात संचालकांनी मोट आवळून अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.
यावर सुनील महाजन यांनी राजीनामा न देता याबाबत गिरीश महाजन आणि आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे धाव घेतली होती. दरम्यानच्या काळात या दोन्ही नेत्यांनी संचालकांची बैठक घेऊन चर्चा केली होती. तथापि, बाजार समिती सभापतींचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते.
सूत्रांच्या माहितीनुसार सभापती पदासाठी मनोज दयाराम चौधरी, लकी टेलर आणि मिलींद चौधरी या तीन नावांची चर्चा सुरू होती. यात अखेर लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांच्या नावावर सभापतीपदाचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
त्यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे आधी दोन वेळेस सभापतीपदाची हुलकावणी दिल्यानंतर लक्ष्मण पाटील हे खऱ्या अर्थाने लकी ठरल्याचे मानले जात आहे. या निवडीप्रसंगी आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आदींसह बाजार समितीच्या संचालकांची उपस्थिती होती.
दरम्यान, निवड जाहीर होताच नूतन सभापतींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. मंगेश चव्हाण यांनी उर्वरीत तीन वर्षात तीन सभापती आणि तीन उपसभापती होणार असल्याचे सूतोवाच केले.