jalgaon hatnur dam: जळगावकरांनो पाणी जपून वापरा! हातनूर धरणातील साठा घटला; केवळ ३०.८२ टक्केच शिल्लक

खान्देशात सूर्य आग ओकत असून रविवारी १७ मे रोजी जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण परिसराचा पारा थेट ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.
Hatnur Dam
Hatnur Damfile photo
Published on
Updated on

जळगाव: खान्देशात सूर्य आग ओकत असून रविवारी १७ मे रोजी जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण परिसराचा पारा थेट ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या प्रचंड उष्णतेच्या लाटेचा थेट तडाखा जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या हातनूर धरणाला बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणी पातळी खालावली असून, वाढत्या तापमानामुळे पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील उपयुक्त पाणीसाठा तब्बल ४ दशलक्ष घनमीटरने घटला असून बाष्पीभवनाचा वेग ०.३४ वर पोहोचला आहे. यामुळे जळगावकरांच्या डोक्यावर पाण्याचे मोठे संकट घोंगावू लागले आहे.

हातनूर धरण: गेल्या वर्षी आणि या वर्षीची तुलनात्मक आकडेवारी

हातनूरवर कोण-कोण अवलंबून?

हातनूर धरणातील पाणी केवळ शेतीसाठी नाही, तर संपूर्ण जिल्ह्याची औद्योगिक आणि नागरी उपजीविका याच पाण्यावर अवलंबून आहे. पाणी आटल्यास खालील क्षेत्रांना मोठा फटका बसेल:

१. १३० हून अधिक गावांची तहान: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, यावल, सावदा या मोठ्या नगरपालिकांसह १३० हून अधिक गावांची पिण्याच्या पाण्याची योजना थेट हातनूर धरणावर अवलंबून आहे. पाणी कमी झाल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल.

२. शेती सिंचनाचा कणा मोडणार: भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि बोदवड या केळीच्या आगार मानल्या जाणाऱ्या तालुक्यांमधील शेती सिंचन उपसा आणि कालव्यांच्या माध्यमातून याच धरणावर चालते. पाणी घटल्याने केळीच्या बागांवर संकट येईल.

३. दीपनगर औष्णिक वीज केंद्र (भुसावळ): दीपनगर येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला लागणारा पाण्याचा अवाढव्य पुरवठा हातनूरमधून केला जातो. पाणी आटल्यास वीजनिर्मिती खंडित होण्याची भीती आहे.

४. मध्य रेल्वे आणि आयुध निर्माणी (वरणगाव): भुसावळ रेल्वे जंक्शन आणि वरणगावची ऑर्डनन्स फॅक्टरी (संरक्षण क्षेत्रासाठी दारूगोळा बनवणारी संस्था) या राष्ट्रीय संस्थांचा पाणीपुरवठा याच धरणावर अवलंबून आहे.

गेल्या वर्षी १७ मे रोजी जळगावचे तापमान ३९ अंश सेल्सिअस होते, जे यंदा थेट ४५ अंश सेल्सिअस वर गेले आहे. तब्बल ६ अंशांच्या या वाढीमुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन कमालीचे वाढले आहे. गेल्या वर्षी बाष्पीभवनाचा निर्देशांक ०.२३ होता, तो आता ०.३४ वर गेला आहे. म्हणजेच पाणी केवळ वापरले जात नसून, सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे दररोज लाखो लिटर पाणी हवेत उडून जात आहे.

धरणातील जिवंत साठा आता केवळ ३०.८२% उरला आहे. अजून पावसाळा सक्रिय होण्यास किमान महिना ते दीड महिन्याचा कालावधी बाकी आहे. अशा स्थितीत पाणी पिण्यासाठी राखीव ठेवायचे की उद्योगांना द्यायचे, असा मोठा पेच प्रशासनासमोर उभा ठाकणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा अपव्यय टाळणे आणि पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news