Accident News  file photo
जळगाव

Jalgaon Accident | जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर ट्रकची दुचाकीला धडक; शाखा अधिकाऱ्याचा मृत्यू

भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी अंत; पत्नी आणि आईवर दुःखाचा डोंगर

पुढारी वृत्तसेवा

Akashwani Flyover Jalgaon Truck Bike Accident

जळगाव : शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार रवींद्र छबुलाल चौधरी (वय ३५, मूळ रा. उत्राण, ता. एरंडोल; सध्या रा. चंदूअण्णानगर, जळगाव) यांचा मृत्यू झाला. ते एका खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कामावर जात असताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र चौधरी हे मोतीलाल ओसवाल या खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून काम करत होते. गुरुवारी सकाळी ते (एमएच १९ डीएन १२८२) दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघाले होते. आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावरून जात असताना आरजे ५० जीए ९२३४ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ते ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. अपघातातील ट्रक आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जमा केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

कुटुंबाचा आधार हरपला

रवींद्र चौधरी यांच्या पश्चात पत्नी आणि आई असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे. अपघाताची बातमी समजताच नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली.

उड्डाणपुलावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तरसोद बायपासवरील वाहतुकीचे नियोजन आणि शहरातील प्रमुख मार्गांवरील वाढता वाहतुकीचा ताण या पार्श्वभूमीवर आकाशवाणी उड्डाणपुलावरील अपघाताने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची बाब या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT