Jalgaon Municipal Corporation Demolition
जळगाव : महानगरपालिकेने वारंवार नोटिसा बजावून तसेच सुनावणीची संधी देऊनही जागा रिकामी न करणाऱ्या अजिंठा चौफुली परिसरातील बेकायदेशीर भंगार बाजारावर अखेर बुधवारी (दि. ३०) कारवाईचा हातोडा पडला. महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात सकाळी साडेदहा वाजल्यापासून दोन जेसीबींच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली. जेसीबीने दुकाने पाडण्यास सुरुवात करताच दुकानदारांची एकच धावपळ उडाली.
अजिंठा चौफुली परिसरातील भंगार बाजाराने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणाबाबत महापालिकेने संबंधित दुकानदारांना अनेकदा नोटिसा बजावल्या होत्या. तसेच रीतसर सुनावणी घेऊन जागा रिकामी करण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने प्रशासनाने अखेर कारवाईचा निर्णय घेतला.
सकाळी महापालिकेचे पथक, पोलीस दल आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. सुरुवातीला दुकानदारांनी स्वतःहून साहित्य हटवून जागा रिकामी करावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या. मात्र, दुकानदारांकडून टाळाटाळ सुरू राहिल्याने महापालिका आयुक्त आदित्य जीवने आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर दोन जेसीबींच्या सहाय्याने प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली.
कारवाई सुरू असतानाच सकाळी साडेअकराच्या सुमारास विभा पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठाचा ‘स्टे ऑर्डर’ असल्याचा दावा करीत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांसमोर सादर केली. मात्र, प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी केली असता अतिक्रमण पाडण्यास स्थगिती देणारा कोणताही न्यायालयीन आदेश नसल्याचे स्पष्ट झाले. दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार असून, तोपर्यंत कारवाई करू नये, अशी विनंती असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर काही दुकानदारांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही स्थगिती आदेश नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा वेगाने सुरू करण्यात आली. जेसीबींचे दात दुकानांवर पडताच दुकानदारांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी धावपळ सुरू केली.
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिका आयुक्त आदित्य जीवने, उपायुक्त पंकज गोसावी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, अतिक्रमण विभागप्रमुख संजय ठाकूर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कारवाईत सहभागी झाले.
पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह टास्क फोर्स आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांचेही धाबे दणाणले आहेत.