Agricultural Equipment Vehicle Theft Jalgaon
जळगाव : सावदा, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर परिसरात शेतकऱ्यांचे शेतीसाठी लागणारे साहित्य, तोलकाट्यांवरील बॅटरी-इन्व्हर्टर, मोटारसायकली आणि इतर साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा निभोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण १० जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या भागात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने प्रभारी अधिकारी हरिदास बोचरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी नाकाबंदी, रात्रगस्त आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला होता. त्यात मुख्य संशयित विलास ऊर्फ काल्या वाघोदे याचा शोध घेतला असता तो फरार झाला. मात्र, त्याच्या घरातून आणि साथीदारांकडून चोरीचे साहित्य आढळून आले.
पोलिसांनी स्वप्नील वासुदेव चौधरी यासह १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून बॅटरी, इन्व्हर्टर मशिन, शेतीसाहित्य, चार मोटारसायकली, दोन पॉवर ट्रोलर, नॅनो कार, सोलर पॅनेल आदी साहित्य जप्त केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत निभोरा पोलीस स्टेशन आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठा सहभाग नोंदवला.