Gulabrao Patil Jalgaon Statement: जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं असून मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या रोखठोक वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी लोकशाही, युती-आघाडी, नगरसेवकांची भूमिका आणि अंतर्गत राजकारणावर थेट भाष्य केलं.
“आपण निवडून आलो म्हणजे आता आपण सर्वांचे असतो. विरोधक जरी आपल्याकडे आले, तरी त्यांना पाणी पाजलं पाहिजे. लोकशाहीमध्ये निवडणूक संपली की विरोधही संपतो,” असं सांगत त्यांनी सुसंस्कृत राजकारणाचा मेसेज दिला. आमदारकीची निवडणूक अजून खूप लांब आहे, आता पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचाही उल्लेख केला. “किशोर पाटील त्यांच्या मतदारसंघात भाजपसोबत युती करणार नाहीत, हे मला माहिती आहे,” असं सांगत गुलाबराव पाटील यांनी आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपशी युती न होण्याचे संकेत दिले. नगरपरिषद निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव येथे शिवसेनेने भाजपशी थेट लढत देत सत्ता मिळवली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाषणात गुलाबराव पाटील म्हणाले, “मी सरकारमध्ये आहे, त्यामुळे मला सगळ्यांसोबत आय लव्ह यू करावं लागतं. जबाबदारी सांभाळून बोलावं लागतं,” असं म्हणत त्यांनी सूचक टोला लगावला. किशोर पाटील यांना मात्र मोकळीक असल्याचं सांगत, “म्हणूनच ते दंड थोपटत आहेत,” असं त्यांनी हसत खेळत सांगितलं.
नगरसेवकांच्या भूमिकेवर टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “निवडून आल्यानंतर काही नगरसेवकांना दोन मोबाईल, चार माणसं आणि हवा लागते. पण काम होवो किंवा न होवो, आलेल्याशी गोड बोला. नगरसेवक निवडून देणाऱ्याला नंतर पाहतही नाही, हे चुकीचं आहे.”
धरणगाव नगरपालिकेच्या राजकारणावर बोलताना त्यांनी आत्मविश्वासाने सांगितलं, “25 वर्षे धरणगावची सत्ता माझ्याकडे होती, ती गेली असं वाटतं. पण ती कायमची गेलेली नाही. ती सत्ता परत माझ्याकडे येईल.” 1996 साली धरणगावचा पहिला नगराध्यक्ष आपणच बसवला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली.