जळगाव : शहरात 2017 साली एका सराफा दुकानदाराचे सोने घेऊन पसार झालेल्या आरोपीला तब्बल आठ वर्षांनंतर वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून अटक करण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून अपहार केलेले 11 लाख 90 हजार किमतीचे 100 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे. रामानंद नगर पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील आर. एन. कॉलनी, गांधी नगर येथे राहणारे सचिन वसंतराव भामरे यांचे पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केट येथे 'साई ज्वेलर्स' नावाचे दुकान आहे. 30 मार्च 2017 रोजी त्यांच्या दुकानातील कामगार सुशांत सुनील कुंडू याने दागिने बनवण्यासाठी दिलेले एकूण 30 तोळे वजनाच्या सोन्याचा अपहार केला आणि तो मूळ गावी पश्चिम बंगाल येथे पळून गेला.
या घटनेनंतर फिर्यादी भामरे यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा त्याच्या मूळ गावी वेळोवेळी शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे हा गुन्हा तपासावर कायम ठेवण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक . अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी . नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह रामानंद नगर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक कार्यरत होते.
दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) भूषण कोते यांना आरोपीबद्दल गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक शोध मोहिमेसाठी रवाना झाले. पथकाने अत्यंत शिताफीने आरोपी सुशांत सुनील कुंडू (वय-39, रा. नरकर पारा, संत्रागाच्छी, जि. हावडा, पश्चिम बंगाल) याला वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेतले.
आरोपीला अटक करण्यात आली आहे . सपोनि भूषण कोते यांनी गुन्ह्याचा पुढील तपास सुरू ठेवला असता, आरोपीकडून कलकत्ता (पश्चिम बंगाल) येथून सुमारे 11 लाख 90 हजार रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण कोते, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक योगेश बारी, अतुल चौधरी, पोलीस शिपाई अनिल सोनवणे आणि दीपक अंजारे यांनी सहभाग घेऊन तब्बल 8 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात मोठे यश मिळवले आहे.