

जळगाव : पूर्वी कार्यकर्ता म्हणून पोलिसांसोबत आंदोलनांत सामना करावा लागायचा, पण आज मंत्री म्हणून पोलिस दलाच्या बळकटीसाठी काम करण्याची संधी मिळतेय, हे माझं भाग्य आहे. जिल्ह्यातील पोलिसांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही आणि पुढेही भासू देणार नाही. ‘पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशन’ ही इमारत म्हणजे सुरक्षिततेचे मंदिर आहे. डीपीडीसीमार्फत चार कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करून हे स्वप्न साकार झालं आहे. नागरिकांनी पोलीस ठाण्यात आल्यावर त्यांना भीती नव्हे, तर विश्वास आणि आत्मविश्वास वाटावा, हाच या इमारतीचा उद्देश आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पोलीस स्टेशनची वैशिष्ट्ये अशी...
धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस दूरक्षेत्राच्या नव्या दुमजल्याच्या भव्य इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
५ हजार चौरस फूट जागेत उभारलेल्या या इमारतीत १४ दालने, आधुनिक सुविधा, सुसज्ज फर्निचर, सोलर सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वातानुकूलित कार्यालयीन व्यवस्था आणि लिफ्ट उपलब्ध आहे. उत्तर महाराष्ट्रातील ‘लिफ्टयुक्त’ पहिले पोलीस स्टेशन म्हणून या इमारतीची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, माझ्या कारकिर्दीतील ग्रामीण भागातील लिफ्टयुक्त हे पहिले पोलीस स्टेशन आहे आणि तेही पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने उभे राहिले, याचा मला अभिमान आहे. जिल्ह्यातील पोलिसांचे बळकटीकरण सर्व पातळ्यांवर सुरू आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले, पोलीस बांधव सण-उत्सव असो वा आपत्ती, सदैव जनतेच्या सेवेत तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आधुनिक व सुसज्ज पोलीस स्टेशन उभारणे हे जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि पोलिसांच्या सन्मानासाठी महत्त्वाचे आहे.”
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, जि.प. माजी सदस्य प्रतापराव पाटील, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, उप कार्यकारी अभियंता एस. डी. पाटील, सरपंच विजय पाटील, लक्ष्मी कोळी, पोलिस निरीक्षक सुनिल पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, तसेच ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. दीपक पवार यांनी सूत्रसंचालन केले. पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन जि.प. माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.