US Iran war impact on Gold Silver Rate
जळगाव : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या दहा दिवसांपासून धगधगत असलेल्या युद्धाचा थेट परिणाम जळगावच्या जागतिक कीर्तीच्या सुवर्ण बाजारावर झाला आहे. युद्धाच्या वणव्यात सोन्या-चांदीचे दर अक्षरशः कोसळले असून, अवघ्या दहा दिवसांत सोन्याचे दर तब्बल ८ हजार रुपयांनी, तर चांदीच्या दरात २४ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे लग्नसराई असूनही ग्राहक सध्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत दिसत आहेत.
गेल्या दहा दिवसांच्या काळात सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उताराने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे. २८ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर विना जीएसटी १ लाख ६८ हजार रुपये होते, ते आज १ लाख ६० हजार रुपयांवर आले आहेत. दुसरीकडे, दहा दिवसांपूर्वी २ लाख ९० हजारांवर असलेली चांदी आज २ लाख ६६ हजार रुपयांवर स्थिरावली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचा भडका उडाल्याने सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याऐवजी गुंतवणूकदारांनी आता आपला मोर्चा 'क्रूड ऑईल' (कच्चे तेल) आणि 'नैसर्गिक वायू'कडे वळवला आहे. कच्च्या तेलाचे भाव वधारत असल्याने मोठे इन्व्हेस्टर्स तिथे गुंतवणूक करत आहेत, ज्याचा फटका सोन्याच्या बाजारपेठेला बसला आहे.
सोन्या-चांदीच्या दरात दररोज होणाऱ्या मोठ्या बदलांमुळे सामान्य ग्राहक संभ्रमात आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने ज्यांच्याकडे विवाह समारंभ आहेत, तेच ग्राहक नाईलाजास्तव खरेदी करताना दिसत आहेत. मात्र, इतर ग्राहकांनी खरेदी थांबवून भाव अजून कमी होण्याची वाट पाहणे पसंत केले आहे.
युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याचे भाव तेजीत होते. मात्र, नऊ दिवसांच्या युद्धानंतर सोन्याचे दर ८ हजारांनी आणि चांदीचे २४ हजारांनी घसरले आहेत. गुंतवणूकदार आता क्रूड ऑईल आणि नॅचरल गॅसमध्ये गुंतवणूक करत आहेत. मार्केटमध्ये सध्या केवळ लग्नसराईचीच खरेदी सुरू असून इतर ग्राहक मात्र दरांचा अंदाज घेत आहेत.- आकाश भगाळे (भगाळे गोल्ड, जळगाव)