जळगाव

Jalgaon politics |...तर बडबड्या नेत्यांनी आधी आपली लोकं सांभाळावी; महाजनांचा राऊतांना टोला

'मैत्रीपूर्ण'चा विषयच नाही, जळगावची जागा भाजपाचीच; गिरीश महाजन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : "राज्यातील विधान परिषदेच्या १७ च्या १७ जागांवर महायुतीच विजय मिळवणार असून, विरोधकांना एकही जागा मिळणार नाही. जळगावात तर भाजपाचे बलाबल प्रचंड मोठे आहे. येथील ६३० पैकी जवळपास ५०० नगरसेवक महायुतीचे आहेत. त्यामुळे जळगावची जागा ही भाजपाचीच होती आणि ती मोठ्या मताधिक्याने आम्हीच जिंकणार, यात कोणतीही मैत्रीपूर्ण लढत किंवा शंका असण्याचा विषयच उरत नाही," असा ठाम विश्वास संकटमोचक आणि ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज येथे व्यक्त केला.

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना ना. महाजन यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. या वेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकास कामांच्या जोरावर सर्व जागा खिशात घालू

ना. गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करताना सांगितले की, "नगरपरिषद, महानगरपालिका आणि विधानसभेला विरोधकांची जी दैना झाली होती, त्यापेक्षाही वाईट परिस्थिती या विधान परिषद निवडणुकीत दिसेल. देशातील आणि राज्यातील जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. याच विकासकामांच्या जोरावर आम्ही पूर्ण ताकदीने सर्व जागा खिशात घालू." आज

बडबड करण्यापेक्षा प्रचारासाठी चांगला वेळ

खासदार संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधत ना. महाजन मिश्कील आणि आक्रमक सुरात म्हणाले, "काहीही बडबड करण्यापेक्षा आता तुम्हाला प्रचारासाठी चांगला वेळ आहे, तो सत्कारणी लावा आणि किमान एखादी तरी जागा निवडून आणून दाखवा. त्यांचे 'बोलबच्चन' नेते फक्त तोंडसुख घेण्याचे काम करत आहेत. मी तर त्यांना आधीच आव्हान दिले होते की, आधी एखादी महानगरपालिका तरी निवडून आणून दाखवा. आपली लोकं यांना सांभाळता येत नाहीत."

या पलीकडे यांना काहीही काम उरलेले नाही

पुढे बोलताना महाजन म्हणाले, "हे नेते कधी जमिनीवर जात नाहीत, जनतेशी त्यांचा साधा संवाद नाही. सकाळ झाली की फक्त माईक समोर उभे राहायचे आणि मोदीजी, देवेंद्रजी किंवा शिंदे साहेबांवर टीका करायची, या पलीकडे यांना काहीही काम उरलेले नाही. त्यांच्या पक्षाचा जनतेवर आणि नेत्यांचा स्वतःच्या कार्यकर्त्यांवर विश्वास राहिलेला नाही. ही विश्वासार्हता गमावलेली माणसे आहेत. त्यामुळे त्यांनी व्यर्थ बडबड करत राहावी, आम्ही निवडणुका जिंकत राहू!"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT