जळगाव : नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवार (दि.15) रोजी झेंडावंदन सोहळ्यानंतर त्यांचा उल्लेख नाशिकच्या पालकमंत्री म्हणून करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, मी एवढंच म्हटलं होतं की, मला पालकमंत्री व्हायचंय. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि महायुतीतील नेते घेतील, तो निर्णय मला मान्य असेल.
महाजन यांनी स्पष्टच केलं की, नाशिकच्या पालकमंत्रिपदावर आपला दावा नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय मान्य राहील. याबाबत कोणतीही रस्सीखेच नाही. बैठका घेत आहे, निर्णय घेत आहे, पण पालकमंत्रिपदाबाबत अडचणी आहेत. लवकरच महायुतीचे नेते योग्य तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
आपण पक्षातील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक असल्याचे सांगून महाजन म्हणाले की, या निर्णयासाठी उशीर होत असला तरी महायुतीतील नेते मार्ग काढतील. भुजबळ हे वरीष्ठ नेते आहेत, मात्र हे तीन पक्षांचे सरकार आहे. मित्रपक्ष व घटकपक्ष यांच्यात वाटप झालेले आहे. जेव्हा तो प्रश्न सुटेल तेव्हा घोषणा होईलच, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महाजन यांनी पालकमंत्रिपदाच्या वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर असल्याचे सांगत, ते जे ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल, असं स्पष्टच सांगितलं आहे.