Himachal Four Accused Nabbed in Jalgaon  Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन् हिमाचलमधील खुनातील संशयित जाळ्यात अडकले

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शनिपेठ पोलिसांची कारवाई; चारही संशयित ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Himachal Four Accused Nabbed in Jalgaon

जळगाव : हिमाचल प्रदेशातील मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी फरार असलेल्या चार संशयितांना जळगावातील शनिपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ताब्यात घेतले. हिमाचल प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पैसे संपल्याने आणि भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी संशयित जळगावात उतरल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

हिमाचल प्रदेशातील मानपुरा पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक ८२/२०२६ अन्वये ३० सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मयत मुकेश कुमार आणि संशयित आरोपी एकत्र दारू पीत असताना बहिणीवरून झालेल्या शिवीगाळीच्या वादातून मुकेश कुमार यांचा खून करून मृतदेह तलावात फेकल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर चारही संशयित दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता किसनपूर येथून निघाले. ते अंबाला येथे पोहोचल्यानंतर अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान पैसे संपल्याने आणि भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी ते जळगाव येथे उतरल्याची माहिती हिमाचल पोलिसांनी शनिपेठ पोलिसांना दिली.

मोबाईल लोकेशनमुळे पोलिसांना मिळाला धागा

दरम्यान, चारही संशयितांचे मोबाईल लोकेशन शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्याचे हिमाचल पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्याशी संपर्क साधून संशयितांची माहिती दिली.

जयस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत गुन्हे शोध पथकाला तातडीने संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली.

परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, तसेच पोलिस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि रवींद्र साबळे यांच्या पथकाने शोध घेत चारही संशयितांना शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले.

चौघेही बिहारमधील

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये चंदन कुमार (रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार), रोशन गोगल मुखिया (रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर), संतोष कुमार (रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर) आणि अजित कुमार (रा. पंडरक, पाटणा) यांचा समावेश आहे.

या कारवाईची माहिती हिमाचल प्रदेशातील मानपुरा पोलिस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी चारही संशयितांना हिमाचल पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे आणि शनिपेठ पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT