FDA Crackdown  AI Photo
जळगाव

Jalgaon FDA Raid | अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर, जळगावात धडक कारवाई

पडताळणी करूनच सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

FDA Crackdown Amalner

जळगाव : जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या पथकाने जिल्ह्यातील काही तालुक्यांतून विनापरवाना उत्पादित सौंदर्यप्रसाधनांची विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे अमळनेर व जळगाव शहरात धडक कारवाई केली. जिल्ह्याचे सहायक आयुक्त(औषधे) डॉ.प्र.भा. अस्वार व त्यांच्या पथकाने यांनी ही कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी अमळनेर येथील प्रियदर्शनी रजाळे यांच्या रवींद्रनगर, अमळनेर येथील ठिकाणी तसेच २४ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील राशी तळरेजा यांच्या महाबळ परिसरातील ठिकाणी पंचासमक्ष तपासणी व चौकशी करण्यात आली.दोन्ही विक्रेत्यांकडून अनुक्रमे रुपये ७२ हजार ३९२ आणि ३३ हजार ९३३ रुपये किमतीच्या सौंदर्यप्रसाधनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यावेळी विविध प्रकारचे लेबल व बिना लेबलचे क्रीम, पावडर, जेल फॉर्ममधील उत्पादने तसेच प्रिंटेड लेबल्स, रिकाम्या बरण्या, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आदी उत्पादनाकरिता लागणारे साहित्य कोणत्याही प्रकारचा वैध उत्पादन परवाना नसताना बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे आढळून आले.

तसेच लेबलवर सौंदर्य प्रसाधनांची साठवणूक करून त्यांची गुणवत्ता तपासणी न करता विक्री केली जात असल्याचेही निदर्शनास आले.

जप्त केलेल्या मालामध्ये विविध क्रीम, पावडर स्वरूपातील अनेक सौंदर्यप्रसाधने, पॅकिंग मटेरियल आदींचा समावेश आहे. त्यापैकी काही सौंदर्यप्रसाधनांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

ही कारवाई डॉ.अस्वार यांच्यासह अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील श्रीमती क. र. पाटील व.लि आणि त्यांच्या पथकाने नाशिक विभागाचे सह-आयुक्त (औषधे) अशोक बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरिकांनी दक्षता घ्यावी

नागरिकांनी सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना त्यांच्या लेबलवर उत्पादन परवाना क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, समूह क्रमांक, उत्पादनाची तारीख, मुदत बाह्यता तारीख आदी माहिती नमूद असल्याची खात्री व पडताळणी करूनच सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्याचे आवाहन डॉ.अस्वार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT