जळगाव : आरोग्य विभाग व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व स्कॅन केलेल्या सहीद्वारे आरोग्य सेवक पदाचा बनावट नियुक्ती आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक पदासाठी भरती प्रक्रिया राबवून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने उमेदवारांचे नियुक्ती आदेश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. या आदेशांचा संदर्भ घेऊन अमोल कैलास सुशीर (रा. जुना सातारा, भुसावळ) याने आरोग्य सेवक पदावर नियुक्तीबाबतचा आदेश बनवून घेतला. त्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा शिक्का व स्कॅन केलेली सही वापरली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बाहेकर यांनी पोलिसांत धाव घेत एकाविरोधात गुन्हा नोंद केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.