

जळगाव : एरंडोल तालुक्यातील खर्ची-सुकेश्वर परिसरात मासे पकडून घरी परतत असलेल्या तरुणाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. ही घटना शनिवार (दि.17) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. एरंडोल पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृताचे नाव शरद रामा भिल (वय ४०, रा. कामतवाडी, ता. धरणगाव) असे आहे. शुक्रवारी (दि.16) रोजी शरद भिल हा सासऱ्यांकडे (लक्ष्मण श्रावण ठाकरे) खर्ची गावात आला असताना शनिवार (दि.17) रोजी दुपारी गिरणा नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी सुकेश्वर शिवारात गेला होता. मासे पकडल्यानंतर घरी परतत असताना अचानक विज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत शरदला तत्काळ एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या छातीवर आणि कानावर जखमा आढळून आल्या आहेत. घटनास्थळी राजेश पाटील आणि महेंद्रसिंग पाटील यांनी पंचनामा केला असून एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.