Robbery Case Pudhari
जळगाव

Jalgaon crime news: एरंडोलमध्ये बंद घराचे कुलूप तोडून ७ लाखांचा ऐवज लंपास

एरंडोल शहरातील अष्टविनायक कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी-कुलूप तोडून तब्बल ७ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon crime news

जळगाव: एरंडोल शहरातील अष्टविनायक कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी-कुलूप तोडून तब्बल ७ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात ३ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ३ लाख ५८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला असून, या धाडसी चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल अनिल चव्हाण (वय ३५, रा. अष्टविनायक कॉलनी, एरंडोल) यांचे कुटुंब बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. २ ते ३ सप्टेंबर दरम्यान चोरट्यांनी घराच्या पुढील दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाट उघडून त्यातील ३ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

त्याचबरोबर, १ लाख रुपये किमतीचे २५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ४८ हजारांचे १२ ग्रॅमचे दुसरे मंगळसूत्र, ३२ हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या (८ ग्रॅम), १ लाख २० हजार रुपयांची ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ४८ हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे दोन जोड (१२ ग्रॅम) आणि प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीच्या ५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या गणपती व लक्ष्मीच्या मूर्ती, असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवजही चोरट्यांनी लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच निखिल चव्हाण यांनी तात्काळ एरंडोल पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT